खेड :
खेड भरणे मार्ग खड्डेमय झाल्याने वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास सुरू होता. राज्य मार्गाच्या दर्जामुळे मार्गाच्या डागडुजीत खोडा पडला होता. यामुळे नगरपरिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवले जात होते. याचा फटका वाहनचालकांना बसत होता. याबाबत ‘तरुण भारत संवाद’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम खात्याने रातोरात खड्डे – बुजवून मार्ग स्थितीत आणला आहे. यामुळे वाहनचालकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
सतत रहदारीच्या मार्गाची दैनावस्था झाली होती. पावसामुळे खड्यांचा विस्तार दिवसागणिक वाढत होता. या खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना वाहनचालकांची दमछाक होत होती. प्रसंगी अपघातही घडत होते. टीकेची झोड उठूनही यंत्रणा सुस्तच होत्या. मार्गाची डागडुजी करायची कुणी, यासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली जात होती. विलंबाच्या प्रवासासह वाहनचालकांनाही आर्थिक कर करावा लागत होता.
‘तरुण भारत संवाद’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. पहिल्या टप्प्यात एसटी आगार, महाडनाका तर दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालयासमोर आणि तीनबत्तीनाका येथील खड्डेमय मार्ग रातोरात सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार घेतला. खड्डे बुजवले असले तरी पावसाच्या संततधारेमुळे ते कितपत तग धरतील, हा प्रश्नच आहे. मात्र तूर्तास वाहनचालकांना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.








