खानापूर : खानापूर शहराच्या पूर्वेकडील शहराच्या प्रवेशद्वारावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात प्रवेश करताना जीव मुठीत घेऊन शहरात प्रवेश करावा लागत होता. या ठिकाणी गेल्या आठ दिवसात दुचाकी आणि चारचाकी कलंडण्याचे प्रकार घडले होते. यात महिला दुचाकीस्वारही पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ‘तरुण भारत’मधून बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन शहरातील युवा कार्यकर्ते पंडित ओगले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील सर्व खड्डे श्रमदानातून बुजविले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, सुरेश देसाई यांनीही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सहकार्य केले.
पारिश्वाड क्रॉसनजीकच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्यामुळे या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले होते. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पावसाच्या पाण्यातून वाहने चालवताना धोका पत्करुन चालवावे लागत होते. त्यामुळे खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकवेळा दुचाकीस्वार कलंडण्याचे प्रकार वारंवार घडत होते. याच रस्त्यावरुन आमदारांची रोज ये-जा असते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्याची डागडुजी करण्याचे स्वारस्यही आमदारांनी दाखवले नव्हते.
‘तरुण भारत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच भाजपचे युवा मोर्चाध्यक्ष पंडित ओगले यांनी सहकाऱ्यांना घेऊन जवळपास पाच-सहा टॅक्टर खडी आणि दगडमाती घालून रस्ता जेसीबीद्वारे वाहतुकीस सुरळीत केला आहे. त्यामुळे नागरिकांचा रस्त्यावरुन खड्डेमुक्त प्रवास होणार आहे. श्रमदानातून खड्डे बुजवल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी विनायक पवार, संजय मयेकर, महादेव पाखरे, केदारी साळुंखे, प्रकाश पुजारी, जोतिबा चौगुले, संतोष देवलत्तकर, पंकज कुट्रे, आदित्य कलाल यांनी सहकार्य केले.









