खड्डा बुजविण्याची वहनधारकांची मागणी : कठडा बांधण्याची गरज
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर रामगुरवाडीनजीक वळणावर रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेल्या खड्ड्यामुळे हे वळण धोकादायक बनले आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने आणि तीव्र उतार असल्याने जांबोटीकडून येणारे वाहन वळण असल्यामुळे खानापूरकडून जाणाऱ्यांना दिसून येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या वळणावरील खड्डा बुजवावा तसेच कठडा बांधण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. खानापूर-जांबोटी रस्त्यावर रामगुरवाडीनजीक वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठा खड्डा निर्माण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.
एकदम वळणावर असल्याने खानापूरकडून जांबोटीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनासाठी जागा देताना अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. समोरून येणारे वाहन वळण असल्यामुळे दिसून येत नाही. वाहन आल्यास एकदम वाहने कडेला घेणेही शक्य नसल्याने वाहनधारकांना येथून प्रवास करताना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. तसेच रामगुरवाडी शेतवडीतून रस्ता या ठिकाणी येऊन मिळत असल्याने शेतवडीतून येणाऱ्या वाहनांनाही धोका आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या वळणदार रस्त्याच्या कडेला पडलेला खड्डा बुजवून धोकादायक वळणाच्या ठिकाणी रस्ता थोडा रुंद करून या ठिकाणी कठडा बांधण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.









