पाऊस कमी झाल्यानंतर डांबरीकरणाची मागणी
बेळगाव : शहरामध्ये रेल्वे ओव्हर ब्रिजची उभारणी करण्यात आली. मात्र या रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली. काही वर्षातच हे रस्ते खराब झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजची अवस्थाही गंभीर झाली होती. त्यामुळे त्याठिकाणी खडी टाकून तेथील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र ही खडी फार दिवस टिकणार नाही. त्यामुळे आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण होणार असून पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. कपिलेश्वर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज उभारणी केल्यानंतर त्याठिकाणी नेहमीच विविध समस्या भेडसावत आहेत. या ओव्हर ब्रिजवरून वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी काही वर्षातच हा रस्ता खराब झाला. महत्त्वाचे म्हणजे उभारणी करतानाच कामाचा दर्जा खराब असल्यामुळे आता केवळ डागडुजी करण्याशिवाय पर्याय नाही. वास्तविक हा रेल्वे ओव्हर ब्रिज करताना याचे योग्य नियोजन करणे तसेच काम देखील उत्तम दर्जाचे करणे गरजेचे होते, पण घाईगडबडीत या रेल्वे ओव्हर ब्रिजची उभारणी करण्यात आली आहे.
खड्डे तरी किती बुजवायचे?
मंगळवारी या रेल्वे ओव्हर ब्रिजवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र हा पूर्णच रस्ता खराब झाल्यामुळे खड्डे तरी किती बुजवायचे? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. तरीदेखील सध्या घाईगडबडीत खड्डे बुजविले आहेत. मात्र पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने या रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.









