खबरदारीसाठी नागरिकांनी लावली खड्डय़ात रोपे
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदवाडी परिसरातील घालण्यात आलेले पेव्हर्स खराब झाल्याने अनेक वर्षांच्या मागणीनंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. नवीन पेव्हर्स घालून रस्ता व्यवस्थित केला पण काही दिवसातच जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई झाल्याने पुन्हा रस्ता खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून दुरुस्ती करण्यात आली नसल्याने यामध्ये नागरिकांनी रोपे लावली आहेत.
हिंदवाडी येथील बस्तीपासून आयएमईआर मुख्य रस्त्यापर्यंतच्या रस्त्यावर घालण्यात आलेले पेव्हर्स पूर्णपणे खराब झाले होते. ये-जा करणाऱया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे सातत्याने तक्रार करण्यात आली होती. पण रस्त्याचा विकास करण्यात आला नाही. कित्येक वर्षांच्या मागणीनंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र काही दिवसातच पुन्हा या रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदण्यात आल्याने घातलेले पेव्हर्स खचले आहेत. काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डय़ांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकी वाहनांना अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना जलवाहिनी घालणाऱया कंत्राटदाराला केली होती. याची दखल घेण्यात आली नाही. हा खड्डा धोकादायक असल्याने वाहनधारकांच्या माहितीसाठी व प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी खड्डय़ामध्ये रोपे लावली आहेत. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









