खंडाळा :
महामार्गावरील खंडाळा ते वेळे (ता. बाई) गावा दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी अरुंद रस्ते अन् सुमारे २५ हून अधिक लहान मोठे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. तर रस्त्यांच्या कामांमुळे वाहन चालक व प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सातारा जिल्ह्यातून जाणारा हा महत्त्वाचा महामार्ग असून ठिकठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. दरम्यान, खंबाटकी घाट मार्गे खंडाळा ते बेळे हा रस्त्या सुमारे १० किमी, वेळे ते खंडाळा असे बोगदा मार्गे ६ किमी अंतर आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ अधिक असते. वेळे बाजूला रस्त्याचे तर खंडाळ्यात जुन्या टोल नाक्यापासुन बेंगरूटवाडीच्या दिशेनी पुलाचे काम सुरू आहे. येथील धोम बलकवडीच्या कालव्यापासून रस्त्याच्या डाव्या बाजूने पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध असते. त्यामुळे शनिवार, रविवारसह सुट्ट्यांच्या दिवशी असणारी बाहतूक आणि न जाणो अपघात झाल्यास वाहनांची कोंडी होते. त्यामुळे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात. तसेच तासन् तास प्रवाशांना तटकळावे लागते. वाहतुक कोंडी फोडताना पोलीस यंत्रणेला कसरत करावी लागत असून बारंबार भेडसावणाऱ्या एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
खंबाटकीत पहिल्या वळणावर रस्ता खचून उंचवटे निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे केसुर्डी फाटा ते वेळे मार्गावर २५ हून अधिक लहान मोठ्या खड्यांमुळे दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना अपघाताचा धोक संभवतो. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
घाटरस्त्यावर काही ठिकाणी डोंगराच्या बाजूचा भाग पावसाळ्यात ढासळतो. रस्त्याच्या कडेला असणारे गटर तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे मोठ्या वाहनाच्या चाकाने पाणी अंगावर येते. लहान वाहनधारक भिजवून जातात.या प्रकाराणे काही वेळा बादाचे प्रसंग घडतात. संबंधितांनी या प्रश्नाची दखल घेवून उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे
- घाटात कायमस्वरूपी क्रेनची मागणी
खंबाटकी घाटात सलग सुट्ट्या, सण, उत्सव असताना वाहनांची गर्दी होते. यावेळी अनेक वाहने गरम होऊन रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. बंद पडलेली वाहने रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी शासकीय क्रेन उपलब्ध होत नाही. रस्ते विकास महामंडळाने दत्त मंदिराजवळ कायमस्वरूपी क्रेन उपलब्ध करून दिल्यास वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे. मात्र खंडाळा ते घाटमाथा परिसरात अपघात झाल्यास कधीच रस्ते विकास महामंडळाची क्रेन उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवासी व बाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागतो.








