पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ल्ड फूड इंडिया 2023 संमेलनाचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी भारत मंडपममध्ये ‘वर्ल्ड फूड इंडिया 2023’ संमेलनाचे उद्घाटन केले आहे. वर्ल्ड फूड इंडियाचे हे दुसरे संमेलन असून याच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी फूड स्ट्रीटचेही उद्घाटन केले आहे. भारताच्या महिलांमध्ये अन्नप्रक्रिया क्षेत्राचे नेतृत्व करण्याची स्वाभाविक क्षमता आहे. याकरता प्रत्येक स्तरावर महिला, कुटिरोद्योग आणि एसएचजींना प्रोत्साहन दिले जात आहे. भारतात जितकी सांस्कृतिक विविधता आहे, तितकीच खाद्य विविधता देखील आहे. आमची आहारसंस्कृतीची विविधता जगाच्या प्रत्येक गुंतवणुकदारासाठी लाभदायक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक देशांमधून मान्यवर दिल्लीत दाखल झाले आहेत. यात क्षेत्रीय खाद्यपदार्थ आणि शाही खाद्यसंस्कृतीचा वारसा जगासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 200 हून अधिक शेफ यात सामील झाले असून पारंपरिक भारतीय पाककला सादर केली जाणार आहे.
मागील 9 वर्षांमध्ये प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांच्या निर्यातीत 150 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. सध्या आमची कृषी निर्यात जागतिक स्तरावर 7 व्या स्थानावर पोहोचली आहे. खाद्यक्षेत्रातील भारताची वृद्धी गतिमान वाटत असली तरीही ही निरंतर आणि समर्पित प्रयत्नांमुळे होत आहे. आमच्या सरकारच्या कार्यकाळात भारताने पहिल्यांदाच कृषी निर्यात धोरण लागू केले आहे. आम्ही पूर्ण भारतात लॉजिस्टिक आणि मूलभूत सुविधेचे एक नेटवर्क स्थापन केले आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्राशी निगडित प्रत्येक कंपनी आणि स्टार्टअपसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
वृद्धीचे तीन मुख्य घटक
भारतात वेगाने शहरीकरण होत असून रोजगाराच्या संधी वाढण्यासोबत पाकिटबंद खाद्यपदार्थांची मागणी देखील वाढत आहे. या महत्त्वाकांक्षी धोरणांसोबत ताळमेळ रहावा म्हणून संबंधितांच्या योजना देखील तितक्याच महत्त्वाकांक्षी असायला हव्यात. अन्नप्रक्रिया क्षेत्रात याच्या यशात योगदान देणारे तीन मुख्य घटक हे छोटे शेतकरी, लघू उद्योग आणि महिला आहेत, असे मोदींनी नमूद पेले आहे.
कानाकोपऱ्यात पोहोचणार भरडधान्य
भरडधान्य आमच्या ‘सुपर फूड बकेट’चा हिस्सा आहे. भारतात आम्ही याला श्ऱीअन्नाची ओळख दिली आहे. भारताच्या पुढाकारावर आज जगात पुन्हा एकदा भरडधान्यावरून जागरुकता मोहीम सुरू झाली आहे. ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय योगदिनाने योगाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले, तसेच आता भरडधान्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील, असा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.
टेस्ट, टेक्नॉलॉजी नव्या भविष्याला देणार जन्म
टेस्ट आणि टेक्नॉलॉजीचे हे फ्यूजन एका नव्या भविष्याला जन्म देईल, एका नव्या अर्थव्यवस्थेला गती प्रदान करतील. सध्याच्या बदलत्या जगात 21 व्या शतकातील सर्वात प्रमुख आव्हानांमध्ये अन्नसुरक्षेचा समावेश असल्याने फूड इंडियाचे हे आयोजन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. मागील 9 वर्षांमध्ये अन्नप्रक्रिया क्षेत्रात 50 हजार कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. हा भारत सरकारच्या उद्योगपुरक आणि शेतकऱ्यांसाठी अनुकूल धोरणांचा परिणाम आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी पीएलआय योजना सुरू केल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
80 कोटी लोकांना मोफत धान्य
पंतप्रधानांच्या दुरदर्शी नेतृत्वात अन्नप्रक्रिया क्षेत्र अभूतपूर्व प्रगती करत आहे. देशातील 140 कोटी लोकसंख्येपैकी 80 कोटी लोकांना मोफत धान्य पुरविण्यात येत असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री पशुपति कुमार पारस यांनी म्हटले आहे.









