आंबेवाडी येथील शेतकऱ्याला फटका : शेतकरी आर्थिक अडचणीत : पाहणी करून भरपाई देण्याची मागणी
बेळगाव : आंबेवाडी येथील शेतकऱ्याची दीड एकर क्षेत्रातील रताळी किडीचा प्रादुर्भाव होऊन पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यामुळे मोठा फटका बसला आहे. डोळ्यादेखत पूर्ण रताळीच किडीने वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. दरम्यान नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. उमेश भांदुर्गे यांनी पावसाळी हंगामात दीड एकर क्षेत्रात रताळी वेलीची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी रताळ्यांवर किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला. त्यामुळे रताळी पीक पूर्णपणे वाया गेले आहे. परिणामी उत्पादनासाठी केलेला खर्च देखील वाया गेला आहे. लागवडीसाठी केलेले ट्रॅक्टरचे भाडे, शेणखत, मजुरी, रासायनिक खत, किटनाशक यासाठी मोठ्या प्रमाणात केलेला पैसा देखील पाण्यात गेला आहे. त्यामुळे भांदुर्गे हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
उत्पादक दुहेरी संकटात
अलीकडच्या काही वर्षांत रताळी लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी रताळ्यांना समाधानकारक दर मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी रताळी लागवड अधिक प्रमाणात केली आहे. मात्र, पावसाअभावी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. खरीप हंगामातील भात, ऊस, बटाटा, सोयाबीन, भुईमूग, रताळी आदी पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. तर काही ठिकाणी पाणी सोडून पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र, माळरानावर लागवड केलेल्या रताळ्यांमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे उत्पादक चिंतेत सापडले आहेत. आधीच रताळ्याचा दर घसरला आहे त्यातच किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.
कर्जाची परतफेड कशी करावी याचीच चिंता
आंबेवाडी येथील शेतकऱ्यांनी यंदाच्या पावसाळी हंगामात लाल जमिनीत या रताळ्याची लागवड केली होती. दरम्यान रताळी काढली असता संपूर्ण खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लागवड केलेली सर्व रताळी खराब झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत ते सापडले आहेत.
खराब रताळी जागेवरच टाकली
दीड एक क्षेत्रात लागवड केलेली रताळी पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यामुळे आर्थिक डेंगर कोसळला आहे. किडीने रताळी खराब झाल्याने जागेवरच टाकण्यात आली आहेत. कृषी खाते, बागायत खाते आणि लोकप्रतिनिधींनी पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी आणि कुटुंबीयांना दिलासा द्यावा.
– उमेश भांदुर्गे, रताळी उत्पादक









