उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट : शेतकऱ्यांना आर्थिक फटका
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून बटाटा काढणीला प्रारंभ झाला आहे. विशेषत: बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, मण्णिकेरी आदी भागात बटाटा काढणीला सुरूवात झाली आहे. मात्र यंदा बटाटा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अलिकडे तालुक्यात बटाटा लागवडीत घट झाली आहे. त्यातच यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने उत्पादकांना फटका बसला आहे. तालुक्यातील कुद्रेमनी, कल्लेहोळ, बसुर्ते, बिजगर्णी, बेळवट्टी, बेळगुंदी, बाकनूर, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, मण्णीकेरी, केदनूर, कडोली, बंबरगा, देवगिरी, गुंजेनहट्टी, हलगा, बस्तवाड, मारिहाळ, कोंडुसकोप आदी भागात बटाटाची लागवड झाली आहे. मात्र यंदा पावसाअभावी बटाटा पीक खराब झाले आहे. तर काही ठिकाणी रोगराई व कुजून बटाटा खराब झाला आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात देखील आवक कमी असलेली पहायला मिळत आहे. समाधानकारक उत्पादन होत नसल्याने काढणी करून ज्वारी पेरणीसाठी धडपड सुरू झाली आहे. शिवाय परतीच्या पावसाने देखील हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. रताळी, भुईमूग व रताळी काढणी झालेल्या शिवारात ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी केली जाते. मात्र यंदा पावसाअभावी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने ज्वारी पेरणीत अडचणी येवू लागल्या आहेत.
बटाटा लागवडीत घट
अलीकडच्या चार वर्षात बटाटा लागवडीत मोठी घट झाली आहे. बटाट्याचे म्हणावे तसे उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आहे. त्यामुळे बाजारात देखील परराज्यातील बटाटा दिसून येत आहे. बटाटा काढणीबरोबर पिकातील तण काढण्याच्या कामात देखील शेतकरी दंग असल्याचे दिसत आहे. रताळी व भुईमूग काढणीला देखील येत्या काही दिवसात प्रारंभ होणार आहे. यंदा बटाट्याच्या तुलनेत रताळी लागवडीचे प्रमाण वाढले आहे. साहाजिकच यंदा रताळी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.









