भुईमूग, सोयाबिन पीक लागवडीला उशिरा प्रारंभ : शेतकऱ्यांची कामाची धांदल
वार्ताहर /धामणे
यंदा मान्सूनपूर्व पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने भात पेरणीला उशीर झाला. त्यामुळे इतर पावसाळी पिकांच्या लागवडीला धामणे, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, देसूर भागातील शेतकऱ्यांनी बटाटा, भुईमूग, सोयाबिन व रताळी या पिकांच्या लागवडीला उशीरा सुरुवात केली आहे. कारण भात पिकाची पेरणी संपताच या भागात गेल्या दोन दिवसांपूर्वी चार दिवस सतत पाऊस पडल्याने इतर पिकांची लागवड थांबली होती. परंतु या भागात सोमवारी व मंगळवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे बटाटा, भुईमूग, सोयाबिन व रताळी लागवडीला जोर आला आहे. यंदा धामणे, नंदिहळ्ळी, राजहंसगड या भागातील शेतकऱ्यांनी रताळ्यांची लागवड जास्त प्रमाणात करण्याचे ठरविले आहे.
बटाटा व सोयाबिन पिकाची लागवड मात्र अत्यंत अल्पप्रमाणात करत असल्याचे दिसून येत आहे. या भागातील शतेकऱ्यांना बटाटा व सोयाबिन लागवड यंदा कमी प्रमाणात दिसत असल्याचे विचारले असता बटाटा लागवड खर्चिक बाब असून या पिकावर ऐन वेळेला रोग पडून हे पीक बाद होत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचप्रमाणे सोयाबिन पीक चांगले येते. परंतु सोयाबिन काढणीच्या वेळेला पावसाचा जोर गेल्या दोन वर्षात झाल्याने हे पीक काढणे कठीण झाल्याने शेतातच न काढता हे पीक खराब झाले आणि गेली दोन वर्षे सोयाबिन पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. रताळ्याचे पीक काढतेवेळी थोड्या उशीराने काढले तरी हे पीक बाद होत नाही. त्यामुळे रताळी पिकाची लागवड आता या भागात जास्त प्रमाणात करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.









