बेळगाव : हिरेकोडी, ता. चिकोडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे आचार्य 108 कामकुमार नंदी महाराजांवर रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी शवागाराबाहेर बेळगाव व चिकोडी पोलिसांनी हजेरी लावली होती. कटकभावी, ता. रायबाग येथील शेतवाडीतील निकामी झालेल्या कूपनलिकेत महाराजांच्या शरीराचे तुकडे करून ते तुकडे टाकण्यात आले होते. शनिवारी तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नांनंतर अवयव ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. गुन्हेगारांनी मुनींच्या शरीराचे एकूण 9 तुकडे केल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला होता. रविवारी सकाळी बिम्सच्या फॉरेन्सिक विभागाच्या डॉक्टरांनी उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी आदींसह अनेक जण शवागाराबाहेर ठाण मांडून होते.
चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून होते. सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ट्रस्टींकडे सोपविण्यात आला. त्यानंतर तो हिरेकोडीला नेण्यात आला. पोलिसांनी नारायण बसाप्पा माळी (वय 32) मूळचा राहणार कटकभावी, ता. रायबाग, सध्या रा. हिरेकोडी व त्याचा साथीदार हसन ढालायत (वय 30) रा. चिकोडी या दोघा जणांना अटक केली असून सर्वांगाने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सहा लाखांच्या आर्थिक व्यवहारातून हा निर्घृण खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले असून जैन समाजाने मात्र पोलिसांची तपासाची दिशा बदलल्याचा आरोप केला आहे.









