कोल्हापूर / सुधाकर काशीद :
खाकी जाड गणवेश, गळ्यात कापडी बॅग, हातात पत्रांचा गठ्ठा आणि ती पत्रे वाटत उन्हा पावसात दारोदारी फिरणारा पोस्टमन आता मात्र इलेक्ट्रिक सायकल बाईक वरून फिरणार आहे .पोस्ट खाते म्हणजे पारंपारिक पद्धतीचाच अवलंब, आधुनिकीकरणाकडे पाठ अशी एक समजूत होती .ती ब्रयापैकी खरीही होती .पण आधुनिक जगात आपलेही स्मार्ट अस्तित्व दाखवत पोस्ट खात्याने कात टाकली आहे अनेक चांगले अंतर्गत बदल केले जात आहेत . त्यात पोस्ट खात्याचा कणा मानल्या जात असलेल्या पोस्टमनला इलेक्ट्रिक सायकल बाईक दिली जाणार आहे .त्यामुळे रस्त्यावरून पायपीट करत जाणारा पोस्टमन आता इलेक्ट्रिक सायकल बाइकवर स्वार झालेला दिसणार आहे .
पोस्ट खात्याचा कारभार अत्यंत पारदर्शी मानला जातो . कमीत कमी भ्रष्टाचार असणारे सरकारी खाते म्हणूनही त्याची ओळख आहे . एका शिस्तबद्धतेत या विभागाचे कामकाज चालू आहे . त्या त्या दिवसाचा हिशोब एक पैशाचाही फरक न येता पूर्ण करण्याची व हिशोब पूर्ण झाल्यानंतरच ऑफिसमधून बाहेर पडण्याची आजही पोस्ट खात्यात पद्धत आहे . केवळ टपाल वाटप नव्हे तर बचत, बँकिंग व्यवहारातही पोस्ट खाते उतरले आहे . टपाल कार्यालयाचे जुना रूप पालटले जात आहे . आणि त्यात नवी भर म्हणजे पोस्टमन आता लाल रंगाच्या इलेक्ट्रिक सायकल बाईक वर दिसणार आहे .
मोबाईल मुळे टपालाचे प्रमाण कमी झाले आहे हे आपण म्हणतो . कारण एकमेकाला पत्र लिहून निरोप पोहोचवण्याचे, ख्याली खुशाली जाणून घेण्याचे दिवस आता संपले आहेत . प्रत्येकाच्या हातात मोबाईल हे जाता जाता संभाषण करण्याचे साधन आहे . पत्र पाठवणे बंद झाले आहे . पण वस्तुस्थिती अशी की पोस्टमनचे काम नेहमीप्रमाणे चालू आहे .याचे कारण म्हणजे नियतकालिके रजिस्टर पत्रे, न्यायालयीन नोटीसा, निमंत्रण पत्रिका, वार्षिक अहवाल, बँकांच्या नोटिसा पोस्टामार्फतच पाठवल्या जातात . कारण तो नोटीस पाठवल्याचा पुरावा म्हणून गृहीत धरला जातो .त्यामुळे टपालांची संख्या कमी झालेली नाही .
हे टपाल वाटण्यापूर्वी सकाळी आठ वाजता पोस्टमनला टपालाचे सॉर्टिंग करावे लागते . ते पत्त्यानुसार एका दिशेने लावले जाते . व त्या त्या हद्दीतील पोस्टमन ते टपाल घेऊन बाहेर पडतो . सोबत बॅगमध्ये टपाल असते . काही टपाल हातात असते . तो एका दिशेने पत्रे वाटत जातो साधारण एका पोस्टमनला यासाठी किमान चार तास सलग चालावे लागते . वस्ती वाढल्याने उपनगरात हा वेळ जास्त लागतो . जुन्या गावात, शहरात पत्ता शोधण्यासाठी पोस्टमनला फारशी अडचण येत नव्हती . पण वस्ती वाढत गेल्याने खूप लांब अंतरावर आता लोक राहायला गेले आहेत . त्या लोकांची एकमेकांशी ओळखही नसते . त्यामुळे एखाद्याचा पत्ता जाणून घेण्यात खूप अडचण येते . आणि पोस्टमनला इकडे तिकडे खूप फिरावे लागते .
आता इलेक्ट्रिक सायकल बाईकमुळे पोस्टमनची पायपिट थोडी सुलभ होणार आहे . या बाईकला पाठीमागे एक बॉक्स आहे . त्यात टपालाचा रजिस्टर पार्सल चा गठ्ठा ठेवण्याची सोय आहे . सायकलचा रंग लाल व त्यावर पोस्टाचा ठळक लोगो आहे . त्यामुळे आता या लाल बाईक वरचा पोस्टमन गावागावात पाहायला मिळणार आहे . संदेश दळणवळण क्षेत्रातला हा नवा बदल लवकरच कोल्हापुरातही सुरू होणार आहे.
दिडशे पोस्टमन..
कोल्हापुरात दीडशे पोस्टमन आहेत . काही वर्षांपूर्वी शहर एका विशिष्ट मर्यादेत होते. त्यामुळे पोस्टमनच्या पायाखालचे सर्व गल्लीबोळ होते . घर आणि घर नंबर त्याला पाठ होते. आता शहर विस्तारले आहे . मोबाईल प्रत्येकाच्या हातात असला तरी पोस्टमनचे काम नेहमीप्रमाणे चालू आहे . आणि रस्त्यावरून एरवी झपझप चालणारा पोस्टमन आता मात्र लाल इलेक्ट्रिक बाइकवर दिसणार आहे.








