मुख्य पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डय़ांचे साम्राज्य
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प पोस्टमन सर्कल येथील खड्डे पाहिले तर हे चित्र एखाद्या दुर्गम भागातील आहे का? असा प्रश्न पडतो. परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती आहे बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱया पोस्टमन सर्कलची. पडलेले खड्डे पाहून वाहने कोठून चालवायची असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. या खड्डय़ांमुळे अपघात होऊन एखाद्या निरपराध्याचा जीव गेल्यास याची जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्ड घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्य पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना या खड्डय़ांमधूनच ये-जा करावी लागत आहे. दुचाकी अथवा चार चाकी वाहन या खड्डय़ांमधून गेल्यास चालत जाणाऱया नागरिकांच्या कपडय़ांवर चिखलमय पाणी उडत आहे. यामुळे वादावादीचे प्रकारही घडत आहेत.
शहरातील एक मुख्य चौक म्हणून पोस्टमन सर्कलची ओळख आहे. या सर्कलमधून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. पोस्ट कार्यालयात कामानिमित्त येणाऱयांची संख्याही खूप मोठी आहे. पोस्ट कार्यालयासमोर वाहनांचे पार्किंग केले जाते. उर्वरित जागेतून खड्डय़ांमधून वाट काढत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









