जीएसएस कॉलेजमध्ये प्रथमच दोन वर्षांचा अभ्यासक्रम : प्रावीण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांना परदेशातही संधी
प्रतिनिधी / बेळगाव
भारतासारख्या विकसनशील देशात शाश्वत विकास साध्य करण्यासाठी पर्यावरण शास्त्राचा अभ्यास आणि नियोजन यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. निसर्ग-पर्यावरण आणि माणूस यांचा एकत्रित विचार करून विकासाची नीती ठरविणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाचा वाढता लहरीपणा, उन्हाळय़ात एका पाठोपाठ येणाऱया उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे, अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरात सध्या पर्यावरण हा चर्चेचा विषय ठरला आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, वृक्षाच्छादन वाढविणे, जैववैविध्याचे संवर्धन, वन्यप्राणी व्यवस्थापन याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
पर्यावरण शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण हा खूप व्यापक आणि सखोल विषय असून त्यामध्ये पर्यावरणाशी निगडित रसायनशास्त्र, हवामान व भूगर्भ विज्ञान, निसर्ग नियोजन व संवर्धन शास्त्र, जैवतंत्रज्ञान-सूक्ष्मजीवशास्त्र, प्रदूषण नियोजन, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय कायदे-धोरण, शाश्वत विकास नियोजन यांचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे. तो करिअरच्या कुठल्याही एका व्याख्येत बसू शकणार नाही इतकी खोली या विषयाची पाहावयास मिळते. यात करिअर करण्याचा मार्ग निवडल्यास तुम्हाला जगभर फिरून प्रवासही करावा लागू शकतो किंवा प्रत्यक्ष प्रयोगशाळेत बसून कामही करावे लागते. पर्यावरण हे क्षेत्र रोजगारक्षम असून यामध्ये करिअरच्या अनेक संधी जगभर उपलब्ध आहेत.

विभागातील अधिकारी होण्याची संधी
निसर्गाच्या सानिध्यात फिरायला, राहायला जाणाऱयांची संख्या वाढत आहे. वन्यजीव पर्यटनाचे प्रमाण दहा वर्षांत दुपटीहून अधिक वाढले आहे. जंगल टूर्सची उलाढाल कोटय़वधी रुपयांच्या घरात गेली आहे. त्यामुळे निसर्गात भटकंतीची आवड आणि पर्यावरणाचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना इको टुरिझम क्षेत्रात खूप वाव आहे. शाश्वत पर्यटनाचे मॉडेल राबवून यशस्वी उद्योजक होणे शक्मय आहे. अथवा गाईड, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पर्यावरण सल्लागार म्हणूनही काम करता येऊ शकते.
पर्यावरण व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, संशोधन, शासकीय-अशासकीय संस्था, निसर्ग पर्यटन, शाश्वत विकास, वनविभाग, मोठे उद्योग, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रकल्प, नगररचना, अपारंपरिक ऊर्जा, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रकल्प इत्यादी या विषयात प्रावीण्य मिळविणाऱया विद्यार्थ्यांना परदेशातही अनेक संधी उपलब्ध आहेत. मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींचा विचार करूनच उत्तर कर्नाटकात जीएसएस कॉलेजतर्फे पहिल्यांदाच या विषयाचा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम बनविला गेला आहे.
या विषय शाखेत काम करण्यासाठी अभिरुची, जिज्ञासूवृत्ती आणि विषयाची आवड असणे गरजेचे आहे. अनेक सामाजिक समस्या आणि पर्यावरणाशी संबंधित अडचणी सोडविण्याची तसेच समस्येची उकल करण्याची तयारी हवी. नेतृत्वगुण आणि संघटक म्हणून काम करण्याची वृत्ती असल्यास या महत्त्वपूर्ण क्षेत्रात आपण ठसा उमटवू शकता.
जीएसएस कॉलेजतर्फे सुरू होणाऱया या विषयाच्या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी वा अधिक माहितीसाठी प्राचार्य बी. एल. मजूकर, जीएसएस कॉलेज, बेळगाव 9482648482 / 9986689985 यांच्याशी संपर्क साधावा.
नुकतीच जीएसएस कॉलेजतर्फे जल चाचणी (भौतिक, रासायनिक, जैविक) प्रयोगशाळेची सुरुवात झाली असून, बेळगावकर मोठय़ा प्रमाणात आपल्या विहिरी, कूपनलिकेच्या पाण्याची तपासणी करून घेत आहेत. त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन कॉलेजने केले आहे.









