वृत्तसंस्था /नवी दिल्ली
78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत पोलिसांसमवेत सर्व सुरक्षा दल सतर्क झाले आहेत. पोलिसांनी गुरुवारी दिल्लीत अनेक ठिकाणी खलिस्तान आणि अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांची पोस्टर्स चिकटविली आहेत. स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानीच्या कानाकोपऱ्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनामुळे सुरक्षा वाढविण्यात आली असून सर्वसामान्य लोकांना जागरुक करण्यासाठी दहशतवाद्यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोडा यांनी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. बांगलादेशी नागरिकांची ओळख पटविण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोडा यांनी स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत दिल्ली पोलीस मुख्यालयात एक आंतरराज्य समन्वय बैठक देखील घेतली आहे. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री निवासस्थान स्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी मिळाली होती. धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आला होता. या ईमेलमध्ये अल-कायदा ग्रूप असा उल्लेख होता.









