टॅरिफ’मधील अस्पष्टतेमुळे भारताने दाखवली ताकद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन सरकारने आंतरराष्ट्रीय शिपिंग नियमांमध्ये केलेल्या मोठ्या बदलांमुळे, भारतीय टपाल विभाग 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेला जाणारी बहुतेक आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तात्पुरती बंद करणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अमेरिकेला वस्तू पाठवणाऱ्या भारतीय ग्राहकांवर आणि व्यापाऱ्यांवर होईल. 25 ऑगस्टपासून अमेरिकेसाठी फक्त पत्रे/कागदपत्रे आणि 100 अमेरिकन डॉलर्स पर्यंतच्या भेटवस्तू पाठवण्याची अनुमती असल्याचे भारतीय टपाल विभागाने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या पार्सल, माल किंवा इतर वस्तूंचे बुकिंग तात्पुरते थांबवले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 जुलै 2025 रोजी एक विशेष कार्यकारी आदेश जारी करत 800 डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवरील सीमाशुल्क सूट रद्द करण्याची घोषणा केली होती. पूर्वी, कमी किमतीच्या वस्तू कोणत्याही शुल्काशिवाय अमेरिकेला पाठवता येत होत्या. परंतु आता 29 ऑगस्ट 2025 पासून सर्व वस्तूंवर त्यांची किंमत काहीही असली तरी शुल्क आकारले जाणार आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याअंतर्गत (आयईईपीए) लागू होईल. तथापि, 100 डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तू सध्या या नियमातून सूट दिली जाणार आहे.
आता आंतरराष्ट्रीय टपाल शिपमेंटवर शुल्क जमा करण्याची जबाबदारी यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनद्वारे (सीबीपी) मान्यताप्राप्त वाहतूक कंपन्या आणि एजन्सींची असेल, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. ‘सीबीपी’ने 15 ऑगस्ट रोजी प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, मान्यताप्राप्त पक्षांची निवड कशी केली जाईल आणि शुल्क कसे जमा केले जाईल हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. या तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अस्पष्टतेमुळे अमेरिकेत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टपाल हाताळणाऱ्या विमान कंपन्यांनी 25 ऑगस्ट 2025 पासून टपाल माल स्वीकारण्यास नकार दिला आहे.
पीआयबीने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, ज्या ग्राहकांनी 25 ऑगस्टपूर्वी बुक केलेल्या वस्तू आता पाठवता येणार नाहीत त्यांना टपाल खर्च परत केला जाईल. यूएसपीएस आणि सीबीपीकडून संपूर्ण माहिती मिळताच सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे विभागाने म्हटले आहे. टपाल विभागाने ग्राहकांना सहकार्याचे आवाहन करतानाच गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.









