काणकोण अर्बन पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत भागधारकांची मागणी : थकबाकी वसुलीवर भर द्यावा
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण अर्बन पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन त्यात भागधारकांनी विविध मागण्या मांडल्या. संस्थेचा एनपीए मोठय़ा प्रमाणात वाढलेला असल्याने जे थकबाकीदार आहेत त्यांची नावे प्रत्येक शाखेच्या सूचना फलकावर लावावीत आणि थकबाकी वसुलीवर अधिक भर द्यावा. कर्मचाऱयांना वेगवेगळय़ा कामांचा अनुभव मिळण्यासाठी अन्य शाखांमध्ये त्यांची बदली करावी, शाखा बंद कराव्या लागल्या, तर ज्येष्ठ कर्मचाऱयांना न्याय मिळवून द्यावा आणि सर्वसाधारण सभेचा अहवाल छापील स्वरूपात देतानाच नोटिसीवर बैठकीचा अहवाल छापण्यात यावा, अशा मागण्या यावेळी शांताजी गावकर, दयानंद देसाई, कुष्टा गावकर, अशोककुमार देसाई, थेवू वेळीप यांनी केल्या.
मागच्या 29 वर्षांपासून संस्थेचा कारभार यशस्वीरीत्या सांभाळणारे अध्यक्ष अमर गावकर, उपाध्यक्ष देवेंद्र नाईक, सचिव अजित पैंगीणकर त्याचप्रमाणे विद्यमान उर्वरित संचालक मंडळाच्या कार्याचे भागधारकांनी कौतुक केले. त्याचबरोबर संस्थेने स्वतःच्या मालकीची जमीन ताब्यात घ्यावी, ज्या शाखा तोटय़ात चालतात त्या बंद करव्यात, संस्थेचे ज्येष्ठ भागधारक, ज्येष्ठ पिग्मी एजंट आणि दहावी, बारावीच्या परीक्षांत यश संपादन केलेल्या भागधारकांच्या मुलांचा गौरव करावा, अशा मागण्या संस्थेचे भागधारक सोयरू कोमरपंत, उल्हास देसाई, दिवाकर भगत, संजय कोमरपंत यांनी करून तसा ठराव घेण्यात आला. अध्यक्ष अमर गावकर यांच्या अध्यक्षतेखाली चावडीवरील सरकारी प्राथमिक शाळेच्या सभागृहात ही सभा घेण्यात आली.
‘एनपीए’त वाढ
या संस्थेच्या एकूण 6 शाखा असून 15 कर्मचारी, तर 13 पिग्मी एजंट आहेत. चावडी शाखा वगळता बाकीच्या शाखा तोटय़ात चालतात, असे यावेळी अध्यक्ष अमर गावकर यांनी मान्य केले. एनपीए मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे यंदा अंदाजपत्रकात नमूद केलेला नफा संस्थेला झालेला नाही. यंदा 10 लाख 61 हजार 750 रु. इतका नफा झालेला असून लाभांश जाहीर करता येणार नाही. त्याचप्रमाणे पीएमसी बँकेमध्ये संस्थेचे 1 कोटी रु. पडून असून ती रक्कम परत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे सचिव अजित पैंगीणकर यांनी स्पष्ट केले.
या संस्थेचे मार्च, 2022 पर्यंत एकूण 7734 भागधारक झालेले असून संस्थेला ‘ब’ दर्जा प्राप्त झालेला आहे. संस्थेचे एक ज्येष्ठ भागधारक आणि माजी संचालक सोयरू कोमरपंत यांची इतर मागासवर्गीय महांमडळावर संचालक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल आणि संस्थेच्या एक कर्मचारी निशा च्यारी यांची लोलये पंचायत मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्या दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तर संस्थेचे खजिनदार घनश्याम देसाई यांच्या अकाली निधनावर दुःख व्यक्त करून त्यांना त्याचप्रमाणे या कालावधीत ज्या भागधारकांचे निधन झाले त्यांना या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
‘ओटीएस’चा 21 कर्जदारांना लाभ
ओटीएस योजनेचा या संस्थेच्या 21 कर्जदारांना लाभ झालेला असून त्यांच्याकडून 18 लाख 59 हजार 670 रु. इतकी रक्कम गोळा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अमर गावकर यांनी स्वागत केल्यानंतर वसुली अधिकारी वसंत देविदास यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत सादर केला. व्यवस्थापकीय संचालिका शिल्पा शिरोडकर यांनी दुरुस्ती अहवाल सादर केला. लेखा अधिकारी नरेश देसाई यांनी नफा-तोटय़ाचा अहवाल मांडला, तर संचालक दामोदर च्यारी यांनी आभार मानले. उपाध्यक्ष देवेंद्र नाईक, संचालक प्रशांत नाईक, विठोबा गावकर, प्रियदर्शिनी गावकर, देसाई यांनी भागधारकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण केले. यावेळी झालेल्या चर्चेत बाळकृष्ण ना. गावकर, उमाकांत पवार, दिलीप देसाई, देविदास नेवकर, गुरू गावकर यांनी भाग घेतला.









