कर्मचाऱ्यांना ई-बाईक, मोबाईल पुरविण्याची मागणी
बेळगाव : पोस्ट विभागाने आपल्या सेवा रूंदावल्या असल्यामुळे पोस्टल कर्मचाऱ्यांवरचा भार वाढला आहे. परंतु त्यांना योग्य सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. पोस्ट विभागाने तात्काळ आयडीसी डिलिव्हरी सेंटर बंद करून कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रीक दुचाकी व मोबाईल पुरवावे, या मागणीसाठी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनच्यावतीने मुख्य पोस्ट कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. पोस्टल सेवांसाठी कर्मचाऱ्यांच्याच वाहनांचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर सर्व सेवांसाठी कर्मचाऱ्यांचेच मोबाईल वापरावे लागत आहेत. काही पोस्टमनना मोबाईल पुरविण्यात आले असून उर्वरीत कर्मचाऱ्यांना मोबाईल उपलब्ध झाले नाहीत. पोस्टल सेवा वाढली असल्याने कर्मचाऱ्यांना ई-बाईक तसेच मोबाईल पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन संघटनेचे बेळगाव विभागीय सेक्रेटरी रवी पाटील, किशोर देशपांडे, भरमा तलवार, एम. ओ. कांबळे, एम. बी. सोनक्की, दुंडाप्पा एम., एस. आर. पाटील, महादेव जुटण्णावर यासह पोस्टल कर्मचारी उपस्थित होते.









