सायबर गुन्हेगारांकडून नवी शक्कल : पत्ता अपडेटच्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला
प्रतिनिधी/ बेळगाव
फेडेक्स कुरियरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी भारतीय पोस्ट खात्याच्या नावाचा आधार घेतला आहे. बेळगावसह कर्नाटकात इंडियन पोस्ट पार्सल डिलिव्हरीसाठी पत्ता अपडेट करण्याच्या निमित्ताने फसवणूक करण्यात येत असून नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्यात येत आहे.
‘तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आहे, बनावट पासपोर्ट आहे, जिवंत काडतुसे पाठविण्यात आली आहेत’, असे सांगत सर्वसामान्य नागरिकांना घाबरवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात येत होती. आपण विमानतळावरील पार्सल विभागातून बोलतो आहोत, असे सांगत फेडेक्स कुरियरच्या नावे फसवणूक केली जात होती. आता यासाठी भारतीय पोस्ट खात्याच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नावे पार्सल डिलिव्हरीच्या निमित्ताने फसवणूक केली जात आहे. एखाद्याच्या मोबाईलवर एसएमएस येतो. थोड्या वेळात त्या व्यक्तीला गुन्हेगारांकडून फोन जातो. ‘आम्ही पोस्ट खात्यातून बोलतो आहोत’, असे सांगत नागरिकांची वैयक्तिक माहिती जमविण्यात येत आहे. त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात पैसा जमा करून घेतला जात आहे.
‘तुमच्या नावे पार्सल आले आहे, दोन-तीनवेळा ते तुम्हाला पोहोचविण्याचा प्रयत्न केला तरी शक्य झाले नाही. तुम्ही 24 तासात तुमचा पत्ता अपडेट करावा लागणार आहे. नहून आलेले पार्सल परत जाते’ असे सांगितले जाते. पार्सल डिलिव्हरीसाठी रक्कम भरावी लागणार असे सांगत लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लिक केले की त्यांचे बँक खातेच हॅक होते.
2022-23 मध्ये घडलेल्या 6 हजार 669 सायबर गुन्ह्यांत 277 कोटी रुपये हडप करण्यात आले होते. 2023-24 मध्ये 29 हजारहून अधिक सायबर गुन्हे घडले आहेत. 1 हजार 457 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांच्या खिशात गेले आहेत. सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जागृती करूनही गुन्हे थांबता थांबेनात. फेडेक्स कुरियरच्या नावे केल्या जाणाऱ्या फसवणुकीविषयी जागृती करताच आता गुन्हेगारांनी भारतीय पोस्टच्या नावाचा वापर सुरू केला आहे. आपल्या मोबाईलवर येणारे एसएमएस, ई-मेल संबंधी प्रत्येकाने खात्री करून घ्यावी. भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती जाणून घ्यावी. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर क्राईम विभागाकडून करण्यात आले आहे. सातत्याने दक्षता घेऊनही जर एखादी घटना घडल्यास त्वरित 1930 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहनही सायबर क्राईम विभागाकडून करण्यात आले आहे.









