दापोली :
कोकणात या आठवड्यात अचानक थंडीत वाढ झाली आहे. हा थंडीचा तडाखा अजून काही दिवस कायम राहणार आहे. मात्र यामुळे आंबा व काजू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने वर्तवली असून या संदर्भात बागायतीची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना सूचवल्या आहेत.
कृषी विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकणामध्ये वाढलेली थंडी पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनारपट्टीनजिक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील काही कालावधीसाठी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायव्य भारताच्या हिमालयीन प्रदेशामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमी अशांतता) सक्रिय असल्याने दक्षिण भारतामध्ये वाढलेल्या थंडीचा तडाखा जाणवत आहे. हा तडाखा काही दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा पिकावर करपा रोगाचा, तसेच तुडतुडे आणि फुलकिड यांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी बागेची वारंवार पाहणी करुन आवश्यकता वाटल्यास विद्यापीठाने शिफारशी केलेल्या पालवी आणि मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी घ्यावी, असे सूचवले आहे.








