कच्च्या तेल दरातील घसरणीचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कपात होत असल्यामुळे भारतातही नजिकच्या काळात पेट्रोल आणि इंधनच्या दरात कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कच्च्या तेलाच्या दरात 10 टक्क्मयांहून अधिक घसरण झाली आहे. गुरुवारी तेलाच्या किंमती जवळपास 5 टक्क्मयांनी घसरून चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत ब्र्रेंट क्रूड ऑईलची किंमत प्रतिबॅरल 70 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरापासून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करू शकते. नवीन वर्षाच्या प्रारंभी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 ते 5 ऊपयांपर्यंत घसरण होऊ शकते, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सध्या पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलदराचा आढावा घेतल्यानंतर कंपन्या किंमतीत बदल करतात. मात्र, गेले काही दिवस इंधनदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता पुढील वर्षी एप्रिल महिन्याच्या आसपास देशात लोकसभा निवडणुका होणार असल्याने इंधन दरामध्ये कपात करण्यासाठी केंद्र सरकार तेल कंपन्यांवर दबाव टाकू शकते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर उतरल्यास भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील असे तज्ञांचे मत आहे. डिसेंबरनंतर सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.









