वाहिन्यांतील गळतीमुळे भरता येत नाहीत टाक्या : पेट्रोल घेऊन आलेल्या बोटी समुद्रातच नांगरुन
पणजी : वास्को येथील माटवे भागात पेट्रोलच्या वाहिनीत गळती होऊन पेट्रोल विहिरीत तसेच आता गटारांतही पोहोचल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. गळती होत असताना पेट्रोल टाक्यांमध्ये भरणे धोकादायक आहे. त्यामुळे टाक्मयांमध्ये पेट्रोल भरणे कमी झाले आहे. मुरगाव बंदरात आलेल्या बोटी गेले आठ दिवस खाली करण्यात आलेल्या नाहीत, याचा परिणाम म्हणून आता गोव्यात पेट्रोलची टंचाई भासण्याची शक्मयता आहे. वास्कोतील विहिरीमध्ये तसेच काही ठिकाणी गटारांमध्ये देखील जमिनीतून झिरपून आलेले पेट्रोल पोचल्यामुळे या परिसरात आता भीतीदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेमके पेट्रोल वा तेल कुठून गळते याचा थांगपत्ता पेट्रोलियम कंपन्यांना गेले अनेक दिवस लागलेला नाही.
टाक्यांमध्ये कमी साठा
पेट्रोल गळतीमुळे बोटी समुद्रातच ठेवण्यात आलेल्या आहेत. परिणामी मुरगाव बंदरातून झुवारीनगर तसेच सांकवाळ पठारावर उभारण्यात आलेल्या टाक्मयांमध्ये पेट्रोलचा साठा पोचलेला नाही. सध्या जो साठा आहे, तो कमी आहे. बंदरामधून येणाऱ्या बोटींतील पेट्रोल, डिझेल ओढून घेण्याची प्रक्रिया पूर्णत: बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. याचा परिणाम म्हणून गोव्यात पेट्रोल, डिझेलची टंचाई होण्याची शक्मयता आहे.
पेट्रोलच्या बोटी समुद्रातच
गेले आठ दिवस पेट्रोल, डिझेल घेऊन आलेल्या बोटी मुरगाव बंदराच्या बाह्य कक्षेत आहे. धक्क्यावर आणून त्यातून पेट्रोल, डिझेल खाली करण्यात आलेले नाही. गोव्याला आवश्यक असलेला साठा कमी होत चाललेला आहे आणि नव्याने पेट्रोल टाक्मयांमध्ये पोचलेले नाही. त्यामुळे टँकरमधून गोव्यातील विविध पेट्रोलपंपांना पुरविले जाणारे पेट्रोल तसेच डिझेल पोचण्याची शक्मयता कमीच आहे.
पेट्राल गळती अन् वास्कोची सुरक्षा
विहरीत, गटारांत होणारी पेट्रोलगळती नेमकी कुठून सुरू झालेली आहे याचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे. परंतु जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही तोपर्यंत टाक्मयांमध्ये पेट्रोल पाठविणे घातक ठरू शकते. छोटीशी ठिणगी उडाली तरी पेट्रोलचा भडका उडू शकतो. एकदा कुठे आग लागली तर अत्यंत बिकट अवस्था वास्कोची होऊ शकते. यासाठी आता तेथे खास पथक नियुक्त करावे लागणार आहे.









