नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाचे पालन करून सहकार्य करावे
सांगली : संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा अलर्ट झाली असून बुधवारी खासदार विशाल पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ व आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनपाच्या यंत्रणेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थिती ही बैठक पार पडली. बैठकीस मनपा, वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. सहा. आयुक्त नकुल जकाते आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरण केले.
मनपा, वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागाने समनव्याने संभाव्य पूरपरिस्थितीत कामकाज करून नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत दक्ष राहावे, असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले आहे.
महापालिकेतून आमदार इद्रिस नायकवडी यांनी पूर काळात पूर पातळी नागरिकांना वेळेत कळणे आवश्यक आहे, त्याबाबत बोर्ड लावून माहिती देण्याबाबत नियोजन करावे असे सूचित केले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीमधील महत्वाच्या भागामध्ये पूरकाळात काही अडचणी निर्माण होतात त्यामध्ये पिण्याचे पाणी, लाईट, इत्यादीबाबत समनव्याने या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे, असे नमूद केले आहे.
सर्व प्रशासन अलर्ट असून योग्य ती सर्व दक्षता घेऊन कार्यवाहीसाठी सज्ज आहे, निवारा केंद्र, त्यामधील पूरबाधित नागरिकांची व्यवस्था याबाबत नियोजन पूर्ण झाले आहे. पूर क्षेत्राबाहेर निवारा केंद्र आणि नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, विजया यादव, स्मृती पाटील पृथ्वीराज चव्हाण, तसेच अधिकारी देखील उपस्थितीत होते.








