संपूर्ण रस्ता कोसळण्याची भीती : प्रशासनाचे साफ दुर्लक्ष : वाहनधारक-नागरिकांतून तीव्र संताप
वार्ताहर /किणये
कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ताच कोसळल्यामुळे जीवघेणा ठरला आहे. बहुतांशी भाग कोसळल्याने कर्ले व बेळवट्टी या दोन्ही गावांचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे. रस्त्यावरील मोठय़ा वाहनांची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे. ‘लोकप्रतिनिधींना अनेकवेळा सांगूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मग आम्ही दाद मागायची तरी कुणाकडे?’ असा सवाल वाहनधारक व या परिसरातील नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधीही खर्च केला जातो. मात्र बेळवट्टी व कर्ले रस्त्यासाठी सदर योजना का राबवली जात नाही? असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिक करू लागले आहेत.
10 वर्षांपूर्वी डांबरीकरण
रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटाहून अधिक खोल खड्डे पडले आहेत. गेल्या दहा ते अकरा वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र रस्त्याची सद्यस्थिती पाहता रस्त्यावरून चालत जाणेही अवघड बनले आहे. कर्ले, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, इनाम बडस, राकसकोप आदी गावातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत उपयोगी आहे. रस्त्याचा बहुतांशी भाग पूर्णपणे उखडून गेला आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या बाजूचा काही भाग कोसळून गेला आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दुतर्फा जमिनी असल्याने शेतकऱयांची रोज ये-जा असते. मात्र सध्या संपूर्ण रस्ताच कोसळण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजाला शिवाराकडे जाताना गैरसोयीचे ठरले आहे. रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने बिजगर्णी मार्गे बेळवट्टी गावाला यावे लागत असल्याने वाहनधारकांना दहा ते पंधरा कि. मी. अधिक अंतर कापावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
बेळवट्टी, इनाम बडस या भागातील कामगार उद्यमबाग व मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला येतात. या गावातील कामगार हे या रस्त्यावरूनच ये-जा करतात. मात्र खड्डेमय रस्त्यामुळे कामगार वर्गही अक्षरशः वैतागून गेला आहे.
प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू

हा संपर्क रस्ता वाहनधारक व शेतकऱयांसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याचा बहुतांशी भाग कोसळला आहे. रस्त्याची इतकी दयनीय अवस्था होऊनही लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे दुर्लक्ष का झाले आहे? या भागातील नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी व प्रशासनाने या रस्त्याची पाहणी करून त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– कल्लाप्पा सुतार, बेळवट्टी









