वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम आज मंगळवारी समोर येणार आहे. प्रदेशात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांशी युती करण्यास तयार आहोत, असा संकेत पीडीपी या पक्षाने दिला आहे. मात्र, यासंदर्भात अंतिम निर्णय मतगणनेनंतरच घेण्यात येईल, असेही या पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
या संकेताचे स्वागत प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. मात्र, आपण कोणाकडेही पाठिंब्यासाठी याचना करण्यास जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतगणना झाल्यानंतर आपण सरकार स्थापण्यास सज्ज आहोत. तथापि, कोणाचे सरकार येणार हे केवळ कोणाला किती जागा मिळतात यावरच अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीडीपीसमवेतच्या संभाव्य युतीसंबंधी अद्याप काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच युती झाल्यास मुख्यमंत्री कोण हा प्रश्नही सध्या अनुत्तरितच असल्याचे सर्व पक्षांकडून दर्शविण्यात येत आहे.
त्यांनी पुढाकार घ्यावा
प्रदेशात स्थिरता आणणे, बेकारी दूर करणे, समाज घटनांना न्याय देणे आदी कार्ये महत्वाची आहेत. आमची युती त्यासाठी कार्यरत राहणार आहे. पीडीपीला जर या कार्यात आम्हाला सहकार्य करायचे असेल तर युतीसाठी त्या पक्षाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. आम्ही कोणाकडे जाणार नाही. आमच्या समोर मोठी आव्हाने आहेत. एक्झिट पोलनुसार आमचे सरकार येत आहे. तथापि, ते चुकीचे असू शकतात किंवा योग्यही असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष संख्या समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतेही अनुमान व्यक्त करणार नाही. सर्व निर्णय मतगणना झाल्यानंतरच घेण्यात येतील, असे अब्दुल्ला यांनी सोमवारी स्पष्ट केले.