वृत्तसंस्था/ ड्युनेडीन
फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे खेळवण्यात आलेल्या इ गटातील सामन्यात नेदरलँड्सने पोर्तुगालचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करत आपली विजयी सलामी दिली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या पोर्तुगालला विजयी सलामी देता आली नाही. या स्पर्धेतील सिडनीच्या फुटबॉल मैदानावर झालेला फ गटातील फ्रान्स आणि जमैका यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
सदर स्पर्धा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. रविवारच्या इ गटातील सामन्यात नेदरलँड्सतर्फे एकमेव गोल खेळाच्या पूर्वार्धात स्टिफेनी व्हॅनडेर ग्रेगेटने पेनल्टीवर नोंदवला. दोन वर्षापूर्वी युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेतील सामन्यात नेदरलँड्सने (हॉलंडने) पोर्तुगालचा 3-2 असा पराभव केला होता. 2019 साली महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत नेदरलँड्स उपविजेता ठरला होता. आता इ गटात नेदरलँड्सला या विजयाबरोबरच तीन गुण मिळाले असून अमेरिका आणि नेदरलँड्स हे संयुक्त पहिल्या स्थानावर असले तरी सरस गोलसरासरीच्या आधारे अमेरिका या गटात पहिल्या स्थानावर आहे.
सिडनीच्या फुटबॉल स्टेडियमवर रविवारी खेळवण्यात आलेला फ गटातील फ्रान्स आणि जमैका यांच्यातील चुरशीचा समना अखेरीस गोलशून्य बरोबरीत राहिला. हा सामना बराब्sारीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जमैकाला मिळालेला हा पहिला गुण आहे. 2019 साली या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या जमैकाला तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या सामन्याला सुमारे 40 हजार शौकीन उपस्थित होते. आता फ गटात फ्रान्स आणि ब्राझील यांच्यातील पुढील सामना येत्या शनिवारी ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल तर जमैकाचा पुढील सामना पनामा बरोबर पर्थ येथे होणार आहे.









