भारत यंदा चीनला मागं टाकून लोकसंख्येच्या बाबतीत अग्रणी पोहेचलाय… आशियातील या दोन दिग्गज राष्ट्रांनी 1950 पासून विश्वाच्या लोकसंख्येत सातत्यानं एक तृतियांश वाटा उचललेला असला, तरी येऊ घातलेल्या 75 वर्षांत चित्र बदलून हा मान मिळेल तो आफ्रिका खंडाला. येत्या 50 वर्षांत, 2098 पर्यंत 95 टक्के वृद्धी ही आफ्रिकेच्या सहारा वाळवंटाच्या दक्षिण दिशेला असलेल्या देशांत होईल आणि त्यात अव्वल क्रमांक मिळविणार तो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोंगो…
जून, 2023…भारताच्या लोकसंख्येनं चीनला 29 लाखांनी मागं टाकलं आणि हे घोषित केलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘पॉप्युलेशन फंड्स स्टेट ऑफ दि वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023’नं…संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार आपली लोकसंख्या 142 अब्ज 86 लाखांवर, तर चीनची 142 अब्ज 57 लाखांवर पोहोचलीय. विश्लेषण केल्यास असं दिसेल की, भारत प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1 कोटी 60 लाख ते 1 कोटी 70 लाखांची भर टाकत चाललाय…अहवालानुसार, 2023 संपेपर्यंत भारतात 14 वर्षांपर्यंतच्या मुलांचं प्रमाण असेल ते 25 टक्के, 10 ते 19 वयोगटाचं 18 टक्के, तर 15 ते 24 गटाचं 26 टक्के…
भारतीयांची आयुमर्यादा सध्या पुरुषांच्या बाबतीत 71 वर्षं, तर महिलांच्या बाबतीत 74 वर्षांवर पोहोचलीय…भारत हा किमान सध्याच्या घडीला तरी विश्वातील सर्वांत मोठा तरुणांचा देश असून 15 ते 24 वषापर्यंतच्या गटाची संख्या 25.4 कोटी. 15 ते 64 या विभागाचा विचार केल्यास तब्बल 68 टक्के व्यक्ती इथं राहतात, तर 65 वर्षांवरील सात टक्के…संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल म्हणतोय की, सध्या दोन तृतियांश लोकसंख्येचं कमी जन्मदर असलेल्या राष्ट्रांत वास्तव्य असलं, तरी 2050 पर्यंत कोंगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स आणि टांझानिया यांच्या लोकसंख्येत तब्बल 50 टक्क्यांची वृद्धी झालेली असेल…जर भारतातील लोकांचा वार्षिक आकडा 2023 संपेपर्यंत स्थिर राहिला, तर आपल्या देशाची लोकसंख्या दुप्पट होण्यास आणखी 75 वर्षं लागतील…
अहवालानं जगाची सध्याची लोकसंख्या 8 अब्ज इतकी वर्तविलीय आणि ती दुप्पट होण्यासाठी 76 वर्षं वाट पाहावी लागणार…‘यूएनएफपीए’ला वाटतंय की, सुमारे 50 टक्के लोकसंख्या 25 वर्षांच्या खालील असल्यानं भारताला मुसंडी मारण्याची प्रचंड संधी असून या ऐतिहासिक संख्याबळाचा योग्य वापर प्रशासनानं करायला हवा. त्यासाठी आरोग्य, शिक्षण, नोकऱ्या यांच्यावर अतिरिक्त खर्च करून अर्थव्यवस्थेला मोलाची चालना द्यायला हवी…सदर अहवालाच्या मते, भारताची 1.4 अब्ज लोकसंख्या म्हणजेच देशाला तितक्याच प्रमाणात संधी !
जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले देश (जून, 2023 पर्यंत)
देश लोकसंख्या (कोटींमध्ये)
भारत 142.86
चीन 142.57
अमेरिका 34
इंडोनेशिया 27.75
पाकिस्तान 24
नायजेरिया 22.4
ब्राझील 21.6
बांगलादेश 17.3
युरोपावर मात आशियाची…
लोकसंख्येचा पहिल्यांदा स्फोट झाला तो युरोपात औद्योगिक क्रांतीनंतर आणि तेथल लोकसंख्येनं गाठला तो 10 कोटींचा टप्पा…18 व्या शतकात ती 20 कोटींपर्यंत, तर 19 वं शतक संपेपर्यंत 40 कोटींच्या आसपास पोहोचली. त्यानंतर झेप घेतली ती वसाहतवादी राजवटी कोसळल्यानंतर आशिया खंडातील लोकसंख्येनं…1950 ते 2023 पर्यंतचं विश्लेषण केल्यास विश्वाच्या वृद्धीत भारताचा वाटा राहिलाय तो 19.3 टक्क्यांचा, तर चीनचा 15.9 टक्क्यांचा…
‘युवा भारता’ची वाटचाल ‘ज्येष्ठ भारता’कडे…
? ‘रॅपिडिटी ऑफ एजिंग इंडिया’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या अहवालात म्हटलंय की, 2010 सालानंतर भारतातील वृद्धांची लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललीय, तर 15 वर्षांखालील गटातील मुलांचा आकडा कमी होतोय…
? या गतीचा विचार केल्यास 2046 साली भारतातील वृद्धांची संख्या 14 वर्षांपर्यंतच्या मुलांवर मात करेल. शिवाय 15 ते 59 वर्षांपर्यंतच्या गटातील व्यक्तीही कमी होतील…
? ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ अहवाल म्हणतोय की, सध्याचा युवा भारत वेगानं ‘म्हातारा भारत’ होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतोय..1 जुलै, 2022 पर्यंत 60 वर्षं आणि त्यावरील ज्येष्ठांचा आकडा 14.9 कोटी (लोकसंख्येच्या 10.5 टक्के) इतका होता. परंतु 2036 मध्ये तो 15 टक्क्यांनी वाढून 22.7 कोटींवर पोहोचेल…
? 2050 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत 20.8 टक्क्यांची वृद्धी होऊन ती 34.7 कोटींवर पोहोचेल अन् भारतात दर्शन घडेल ते पाच नागरिकांमध्ये एका वृद्धाचं…
? चालू असलेलं शतक संपेल तेव्हा वृद्धांचा आकडा नोंद करेल तो 36 टक्क्यांचा…
? ‘एजिंग इंडेक्स’ अहवालानुसार, 2021 सालच्या लोकसंख्येतील 100 मुलांमागं समावेश होता तो 39 वृद्धांचा. त्यात प्रामुख्यानं अंतर्भाव दक्षिण नि पश्चिम भारताचा…
वृद्ध महिलांच्या संख्येत होईल वाढ…
? सदर अहवालानं आपल्या कुटुंबावर संपूर्णरीत्या अवलंबून असलेल्या व्यक्तींवर देखील प्रकाश टाकलाय. त्यानुसार, काम करणाऱ्या 100 व्यक्तींमागं समावेश होतो तो अशा 16 वृद्ध नागरिकांचा…
? 60 वर्षांच्या महिलेत क्षमता असेल ती, सरासरी 79 वर्षांपर्यंत जगण्याची, तर पुरुषांत 77.5 वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची…ही आकडेवारी असं स्पष्ट करतेय की, वृद्ध महिलांची संख्या भविष्यात वृद्धी नोंदवेल…
? अहवाल म्हणतोय की, 2022 ते 2050 दरम्यानच्या कालावधीत भारताची लोकसंख्या 18 टक्क्यांनी वाढेल, तर ज्येष्ठ व्यक्तींची तब्बल 134 टक्क्यांनी…80 वर्षांवरील वृद्धांचा आकडा तर चक्क 279 टक्क्यांनी वाढलेला दिसेल…
? 60 ते 80 वर्षांपर्यंतच्या विधवा महिलांची संख्या वाढल्यानं प्रशासनाला त्यांच्यासाठी खास योजनांची तरतूद करावी लागेल…
1950 ते 2023 पर्यंत पडलेली भर…
देश 2023 ची लोकसंख्या 1950 पासून पडलेली भर जगातील लोकसंख्येतील वाटा
भारत 1429 दशलक्ष 1072 दशलक्ष 19 टक्के
चीन 1426 दशलक्ष 882 दशलक्ष 16 टक्के
इंडोनेशिया 278 दशलक्ष 208 दशलक्ष 4 टक्के
पाकिस्तान 240 दशलक्ष 203 दशलक्ष 4 टक्के
अमेरिका 340 दशलक्ष 192 दशलक्ष 3 टक्के
सर्वांत जास्त लोकसंख्या असलेली राज्यं…
राज्यं 2011 मधील लोकसंख्या 2023 मधील अंदाजित लोकसंख्या
उत्तर प्रदेश 19.98 कोटी 23.15 कोटी
महाराष्ट्र 11.23 कोटी 12.49 कोटी
बिहार 10.4 कोटी 12.85 कोटी
पश्चिम बंगाल 9 .12 कोटी 10.08 कोटी
आंध्र प्रदेश 8.45 कोटी 9.17 कोटी
मध्यप्रदेश 7.26 कोटी 8.50 कोटी
तामिळनाडू 7.21 कोटी 8.36 कोटी
राजस्थान 6.85 कोटी 7.95 कोटी
कर्नाटक 6.10 कोटी 6.95 कोटी
गुजरात 6.04 कोटी 7.04 कोटी
मध्यमवर्ग, अतिश्रीमंत सुटतील सुसाट…
? ‘मिडल क्लास’ हा भारतीय लोकसंख्येतील टक्केवारी आणि संख्या अशा दोन्ही बाबतींत सर्वांत वेगानं वाढणारा प्रमुख वर्ग. तो 1995 ते 2021 दरम्यान दरवर्षी 6.3 टक्के दरानं वाढत गेलेला असून मध्यवमवर्ग आता लोकसंख्येत 31 टक्के वाटा उचलतो. एका अंदाजानुसार, 2031 पर्यंत हा हिस्सा 38 टक्के, तर 2047 मध्ये 60 टक्क्यांवर पोहोचेल…
? एका सर्वेक्षणानुसार, देशातील वर्षाकाठी 6 हजार ते 36 हजार डॉलर्स इतकं उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांची विद्यमान लोकसंख्या 43.2 कोटी. ती 2031 पर्यंत 71.5 कोटींवर पोहोचेल, तर वार्षिक 1 हजार 520 डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरिबांचा आकडा निम्म्याहून अधिक घटून 7.9 कोटींवर येईल…
? याच अंदाजानुसार, चालू दशक संपेपर्यंत अतिश्रीमंत कुटुंबांमध्ये पाचपट वाढ होईल. वर्षभरात 2 कोटी ऊपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या अतिश्रीमंत कुटुंबांची संख्या 2016 ते 2021 या पाच वर्षांत जवळजवळ दुप्पट होऊन 18 लाख झाली. ती 2031 पर्यंत 91 लाखांचा स्तर गाठेल…
संकलन : राजू प्रभू









