83 व्या वाढदिवसानंतर तिसऱ्याच दिवशी अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सन ऑफ सत्यमूर्ती, टेम्पर, येवडू यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते कोटा श्रीनिवास यांचे रविवार, 13 जुलै रोजी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 10 जुलै रोजी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.
कोटा श्रीनिवास यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमधील 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यशस्वी चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त त्यांनी राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते 1999 ते 2004 पर्यंत आंध्र प्रदेशातील विजयवाडा-पूर्व मतदारसंघाचे आमदार होते.
कोटा श्रीनिवास बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांनी रविवारी सकाळी हैदराबादमधील ज्युबिली हिल येथील बंगल्यात अखेरचा श्वास घेतला. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. कोटा श्रीनिवास यांनी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून आज ते आपल्यात नसले तरी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांची ओळख कायम टिकून राहील, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr यांनी म्हटले आहे.
कोटा श्रीनिवास यांचे लोकप्रिय चित्रपट
कोटा श्रीनिवास यांनी अल्लू अर्जुनसोबत ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांनी प्रतिघात, रक्तचरित्र आणि टायगर श्रॉफच्या बागी या हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. कोटा श्रीनिवास शेवटचे 2023 मध्ये ‘कब्जा’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात उपेंद्र राव, राजकुमार, किच्चा सुदीप, श्रिया सरन यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.









