कार्डिनल जॅकब कूवाकाड यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ कोची
पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यावरून भारतीय कार्डिनल जॉर्ज जॅकब कूवाकाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पोप फ्रान्सिस 2025 नंतर भारताला भेट देऊ शकतात. 2025 हे कॅथोलिक चर्चने ज्युबली वर्ष म्हणून घोषित केले आहे. या वर्षात रोममध्ये अनेक समारंभ आयोजित होणार आहेत. त्यानंतरच पोप फ्रान्सिस हे भारत दौऱ्यावर येतील असे कूवाकाड यांनी सांगितले आहे.
मंगळवारी केरळ येथे पोहोचल्यावर कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्डिनल जॉर्ज जॅकब कूवाकाड यांचे स्वागत करण्यात आले. मी माझ्यासाठी सर्वांच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वादाचे मी गर्वाने स्मरण करतो. पोप फ्रान्सिस हे 2025 नंतर भारतात येऊ शकतात, आम्ही यासाठी आशा आणि प्रार्थना करू शकतो असे ते म्हणाले.
5 डिसेंबर रोजी 51 वर्षीय कूवाकाड यांना पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनलच्या पदावर पदोन्नती दिली होती. प्रसिद्ध सेंट पीटर बेसिलिकामध्ये आयोजित या सोहळ्यात जगभरातील पाद्री आणि मान्यवरांनी भाग घेतला होता. यात विविध देशांच्या 21 नव्या कार्डिनल्सना सामील करण्यात आले होते. कूवाकाड यांच्या नियुक्तीनंतर व्हॅटिकनमध्ये भारतीय कार्डिनल्सची संख्या 6 झाली असून यामुळे व्हॅटिकनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व आणखी मजबूत झाले आहे.









