भेदभाव संपुष्टात आणणारा नायक असा उल्लेख
वृत्तसंस्था/ रोम
ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी भारतातील संत श्री नारायण गुरु यांचे कौतुक करत त्यांचे संदेश पूर्ण जगासाठी प्रासंगिक असल्याचे म्हटले आहे. नारायण गुरु यांचा समाज सुधारणांचा संदेश सद्यकाळातील आमच्या जगासाठी प्रासंगिक आहे, सध्या लोक आणि देशांमध्ये असहिष्णुता तसेच द्वेष वाढत असल्याची उदाहरणे दिसून येत आहेत असे पोप यांनी म्हटले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथे श्री नारायण गुरु यांच्या सर्व-धर्म संमेलनाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त व्हॅटिकनमध्ये जमलेले धर्मगुरु आणि प्रतिनिधींना संबोधित करताना पोप यांनी हे उद्गार काढले आहेत.
जगात सध्या अशांततेचे वातावरण असून त्याकरता धर्मांची शिकवण न अंगिकारणे देखील कुठे ना कुठे जबाबदार आहे. श्री नारायण गुरुंनी स्वत:च्या संदेशाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक जागृतीला चालना देण्यासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले. गुरुंनी स्वत:च्या संदेशात सर्व मनुष्य, मग त्याची जाती, धर्म आणि सांस्कृतिक परंपरा कुठल्याही असो, एकाच मानव परिवाराचे सदस्य आहेत. कुठल्याही प्रकारे आणि कुठल्याही स्तरावर कुणासोबत भेदभाव होऊ नये यावर त्यांनी जोर दिला होता असे पोप यांनी म्हटले आहे.
अनेक समुदाय आणि लोकांना वंश, रंग, भाषा आणि धर्माच्या आधारावर दररोज भेदभाव तसेच तिरस्काराला सामोरे जावे लागते आणि हिंसेचा सामना करावा लागतो ही दु:खाची बाब आहे. धर्मांच्या महान शिकवणींना न अवलंबिल्यानेच जगात अशांतता निर्माण झाली आहे असे पोप म्हणाले.
नारायण गुरु यांनी एक जाती, एक धर्म, एक ईश्वरचा प्रसिद्ध नारा दिला होता. 1888 मध्ये त्यांनी अरुविप्पुरम येथे भगवान शिवाला समर्पित एक मंदिर उभारले होते, जे त्या काळातील जात-आधारित निर्बंधांच्या विरोधात होते. तसेच त्यांनी मंदिरांमध्ये आरसा ठेवत परतात्मा प्रत्येकाच्या मनात असल्याचा संदेश दिला होता.









