रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी रशिया व युक्रेन यांना त्वरित युद्ध थांबविण्याचे आवाहन केले आहे. युद्ध हा समस्या सोडविण्याचा मार्ग नसून तो सर्वांनाच विनाशाकडे घेऊन जाईल. त्यामुळे दोन्ही देशांनी चर्चा आणि सामोपचाराच्या मार्गाने मतभेद दूर करावेत असा संदेश त्यांनी दिला.
रविवारी ते प्रार्थनेनंतर भाविकांना उद्देशून संबोधन करीत होते. शांततेचा विजय होवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला युक्रेनच्या मेलिटोपोल या शहराचे महापौर आणि तीन लोकप्रतिनिधी उपस्थित होते. फ्रान्सिस यांनी रशियाचे थेट नाव घेतले नाही. तथापि, सूचक शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांनी ‘ईस्टर ट्रूस’चे आवाहन केले. या संघर्षातील सर्व संबंधितांनी आता टेबलाभोवती बसून चर्चा करावी. तोच प्रभावी मार्ग ठरेल, अशी सूचना त्यांनी केली.









