ऐनवेळी कारवाईचा बडगा उगारल्यास मूर्तिकारांचे नुकसान : प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेण्याची मागणी
खानापूर : महाराष्ट्रात गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक घटकांपासून घडविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कर्नाटक राज्यात नियम बंधनकारक व्हावेत, अशी मागणी मूर्तिकारांकडून जोर धरू लागली आहे. पीओपी मूर्तीवर तीन वर्षांपूर्वी राज्यात निर्बंध लावले असताना बंदीचा आदेश केवळ कागदावरच ठेवण्यात आला. परिणामी प्रदूषणाचा मुद्दा पुन: ऐरणीवर आला असून आतापासूनच कारवाई हाती घेण्याची गरज आहे. चार वर्षापूर्वी कर्नाटकात पीओपी गणेशमूर्तीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती मूर्तिकारांना अच्छे दिन आले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींबाबत निर्णय झालेला नव्हता. घरगुती गणेशमूर्ती शाडू माती किंवा पर्यावरणपूरक घटकाने तयार करण्याचा आदेश शासनाने मूर्तिकारांना बजावला होता. तालुक्मयातील विश्र्रांतवाडी, खानापूर, जांबोटी, निट्टूर, गणेबैल, सिंगिनकोप, फुलेवाडी, गर्लगुंजी, नंदगड, हेब्बाळ, घोटगाळी, गोधोळी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. पीओपी मूर्तीची मागणी वाढल्याने पारंपरिक मूर्तिकारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कमी खर्चिक असलेल्या पीओपी मूर्तीत अधिक नफा मिळत असल्याने राज्याबाहेरील अनेक व्यापारी तपासूनच मूर्ती तालुक्यात देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यंदाही शाडूसमोर पीओपीचे आव्हान राहणार आहे.
पाणी प्रदूषणामुळे जलचरांना धोका
घरगुती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तलाव, विहीर आणि नदी नाल्यात सोडण्यात येतात. त्याचे विघटन न झाल्याने त्या अनेक महिने पाण्यावर तरंगताना दिसतात. एकप्रकारे विटंबनाच केली जाते. मासे आणि इतर जलचर, पशू पक्ष्यांवर देखील याचा विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती घ्याव्यात. पर्यावरणपूरक असणाऱ्या शाडू मूर्तींना मोठी मागणी आहे. गोव्यासह कोकणपट्ट्यात तसेच धारवाड, हुबळी, म्हैसूर, होस्पेट, हल्याळ, कारवार भागात शाडूच्या मूर्तींचीच पूजा केली जाते. पीओपीपासून बनविलेल्या मूर्तीला निषिद्ध मानले जाते. त्यामुळे त्या भागातून शाडू मूर्तीला अधिक मागणी आहे. मात्र असे असताना बंदी असूनदेखील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार मूर्ती मोठ्या प्रमाणात तालुक्यात आणल्या आहेत. खरेतर पीओपी मूर्तिंमुळे अस्सल मूर्तिकारांसमोर बेरोजगारीचे संकट उभे असताना याची जाणीव त्यांना नाही. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती देत पावित्र्य जपावे. याबाबत नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता प्रदूषण बोर्डाकडून आम्हास अद्याप याबाबत काहीही सूचना आलेली नाही, असे सांगण्यात आले. तहसीलदार कार्यालयाकडून याच पद्धतीचे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये मूर्ती बनविण्याबाबत काही अंशी संभ्रम निर्माण झाला आहे.
पीओपी बंदीची अंमलबजावणी होणे गरजेचे
धारवाड, हुबळी, हल्याळ, कारवारसह गोव्यात पीओपीवर कडक निर्बंध असल्याने तालुक्मयांत शाडू मूर्तींना मोठी मागणी आहे. सर्वाधिक शाडू मूर्ती बनविणाऱ्या विश्र्रांतवाडी गावात धारवाड, हुबळीसह परराज्यातूही व्यापाऱ्यांची मोठी मागणी असते. यंदादेखील ही मागणी दुप्पट झाली. पर्यावरणपूरक गणेशचतुर्थी व्हावी यासाठी पीओपी बंदीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडून बंदीचा ऐनवेळी निर्णय नको
तालुक्यातील मूर्तिकारांनी शासनाच्या निर्बंधाचा आदेश न आल्याने यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत. अशा मूर्तीवर बंदी योग्यच आहे. मात्र प्रशासनाकडून बंदीचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. आणि कारवाई केल्याचे दाखवण्यात येते. त्यामुळे मूर्तिकारांचेही नुकसान होते. यासाठी जर प्लास्टर ऑफ पॅरीसवर बंदी आणावयाची असल्यास सहा महिन्याअगोदर नियोजन होणे गरजेचे आहे.
– जोतिबा कुंभार, खानापूर तालुका मूर्तीकार संघटना अध्यक्ष
ग्रामीण भागातील मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
तालुक्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी नसल्याने मूळ मूर्तिकारावर उपासमारीची वेळ आली आहे. कोल्हापूर व इतर ठिकाणाहून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती आणून कोणीही विक्री करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या प्रदूषण पसरवणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर कडक निर्बंध आणावेत, आणि मूर्तिकारांच्या कलेला वाव द्यावा.
– भैरु कुंभार, कुंभार समाज अध्यक्ष









