जिल्हा प्रशासनाचा तुघलकी कारभार : गणेशभक्त-मूर्तिकारांमध्ये संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
घरगुती गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या असून अनेक गणेशभक्तांनी त्या बुकिंगही केल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या रंगकामाचे काम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीओपी बंदीचा आदेश बजावला आहे. गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आला असताना पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा प्रकार कितपत योग्य आहे? तसेच जिल्हा प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्याचबरोबर गणेशमूर्तींना वापरला जाणारा रंग देखील पाण्यातील जिवांसाठी धोकादायक ठरत आहे. वॉटर पोल्युशन (प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोल) अॅक्ट 1974 सेक्शन 33(ए) नुसार प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच धोकादायक रंग वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पीओपी मूर्तींमुळे प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित होत असल्याने माती अथवा शाडूच्या मूर्ती तयार कराव्यात, असे जिल्हा प्रशासनाने सुचवले आहे. तसेच मूर्तींचे विसर्जन तलाव, धरण अथवा नद्यांमध्ये न करता कृत्रिम तलावांमध्ये करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाने उशिरा हा आदेश बजावला आहे. यामुळे मूर्तिकार व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.
गणेशमूर्ती तयार करण्याचे काम हे सात-आठ महिन्यांपूर्वीच सुरू होते. त्यामुळे आदेश बजावयाचाच असेल तर तो सात-आठ महिन्यांपूर्वीच बजावणे गरजेचे होते. पुढील आठवड्यात बऱ्याच मंडळांचे आगमन सोहळे असून त्यासाठी गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जिल्हा प्रशासनाने वरातीमागून घोडे या उक्तीप्रमाणे काम सुरू ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूरहून दोन लाखांहून अधिक गणेशमूर्ती दाखल
बेळगाव परिसरामध्ये घरोघरी गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. यावर्षी अंदाजे दोन लाखाच्या आसपास कोल्हापूर येथून गणेशमूर्ती मागविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक मूर्तिकारांवर कारवाई केली जाते. परंतु, कोल्हापूर येथून गणेशमूर्ती आणून बेळगावमध्ये विक्री करणाऱ्यांवर कोणतीच बंधने नाहीत. त्यामुळे कारवाई केली तर सरसकट सर्वांवरच करावी. अन्यथा कारवाईचा फार्स करू नये, असा इशारा मूर्तिकारांनी दिला आहे.
बंदी 7 ते 8 महिन्यांपूर्वीच लागू करावी
सरकारने विचार करूनच पीओपी बंदीचा निर्णय घेतला असावा. या निर्णयाला आमचीही सहमती आहे. परंतु, ही बंदी जर 7 ते 8 महिन्यांपूर्वी लागू केली असती तर आज लाखो पीओपी मूर्ती तयार झाल्या नसत्या. त्याचबरोबर स्थानिक मूर्तिकारांवर कारवाई केली जात असताना कोल्हापूर व इतर भागातून येणाऱ्या दोन लाखांहून अधिक गणेशमूर्तींवरही बंदी घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-मनोहर पाटील (अध्यक्ष-बेळगाव मूर्तिकार असोसिएशन)









