अवजड वाहन रस्त्यातच ऋतले : परिसरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य
पाचगाव प्रतिनिधी
मोरेवाडी,आर के नगर परिसरात खुदाई करून नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. खुदाई नंतर चर व्यवस्थित न मुजवल्यामुळे अवजड वाहन ऋतून रस्त्यातच मध्यभागी अडकून वाहनाचे नुकसान होण्याचे प्रकार आर के नगर परिसरात घडत आहेत.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आर के नगर,मोरेवाडी, पाचगाव परिसरात नवीन पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला खुदाई करण्यात येत आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर या खुदाई केलेल्या जागेवर वर मुरूम पसरला जात आहे. या मुरमामुळे परिसरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सोमवारी दुपारी आर के नगर येथील वीरशैव बँकेसमोर मालवाहतूक करणारा टेम्पो पाईपलाईन टाकून चर मुजवली आहे अशा जागी रस्त्याच्या मध्यभागी रुतला. त्यामुळे या वाहनाचे कमान पाट्याचे नुकसान झाले.
मोरेवाडी, आर के नगर परिसरातील निकृष्ट कामामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वाहने रस्त्यात अडकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पावसाळ्यात या खुदाईचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. कॉन्ट्रॅक्टर ने निकृष्ट दर्जाचे काम पुढे चालू ठेवल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी दिला आहे.
आर के नगर मध्ये खुदाईमुळे रस्ते बनले अरुंद
पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई सुरू आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर त्यावर मुरमाचे मोठे थर तयार झाले आहेत. यामुळे सुनियोजित आरके नगर मधील रुंद असणारे रस्ते अरुंद बनले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असल्याचे विकास बुरबुसे यांनी सांगितले.
प्रशासनाचे आणि सरपंचांचे या पाईपलाईन टाकण्याच्या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसते नागरिकांना धुळीचा आणि अरुंद रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना सरपंच कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.कॉन्ट्रॅक्टर कडून मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. मोरेवाडी चे सरपंच ए व्ही कांबळे यांनी कॉन्ट्रॅक्टरला योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









