शिळे अन्न देत असल्याची तक्रार, बालकांच्या जीवाशी खेळ, अधिकाऱ्यांनी केली पाहणी : पालकांतून संताप
वार्ताहर /किणये
बिजगर्णी गावातील शिवाजी चौकाजवळ असलेल्या एका अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात येत आहे. यामुळे बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला आहे. अंगणवाडीत पाठविलेल्या बालकांना चांगल्या पद्धतीचा आहार मिळत नसल्याने काही पालकांनी याबाबत निवेदनाद्वारे ग्राम पंचायतीमध्ये तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन सीडीपी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सदर अंगणवाडीला भेट देऊन चौकशी केली आहे. बिजगर्णी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 119 मध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार देण्यात आहे. तसेच त्यांना अक्षरांची ओळखही व्यवस्थितरित्या करून देण्यात येत नाही. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. मंगळवारी अंगणवाडीतील एका बालकाला उलटी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. शिळे अन्न बालकांना देण्यात आले होते. यामुळेच त्या बालकाला उलटी झाली असल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे. बुधवारी दुपारी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या अंगणवाडीला भेट दिली व सदर अंगणवाडी शिक्षिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच त्यांची कसून चौकशीही करण्यात आली आहे. यावेळी पीडीओ रविकांत तसेच संतोष कांबळे व काही ग्राम पंचायत सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते.
आहाराबाबत तक्रारी वाढू लागल्या
प्रशासनामार्फत बालकांना पोषक आहार मिळावा, यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून आहार पुरविला जातो. मात्र काही ठिकाणी बालकांना पौष्टिक आहार दिला जात नाही. अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.









