परिसरात दारूच्या बाटल्या अन् काचा : नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया
बेळगाव : वडगाव रोडवरील पशुवैद्यकीय हॉस्पिटलची दुरवस्था झाली आहे. दुपारचे 3 वाजून गेले तरी याठिकाणी कोणीही डॉक्टर उपलब्ध नव्हते. हॉस्पिटलचा दरवाजा कुलुपबंद असल्याचे आढळले. याशिवाय या हॉस्पिटल परिसरात दारूच्या बाटल्या अन् काचा तसेच दारूची रिकामी पाकिटे आढळली आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या हॉस्पिटलमधून डॉक्टर तातडीच्या उपचारासाठी बाहेर जाण्याची शक्यता असते. परंतु त्याची कल्पना कोणालाही नसल्याने डॉक्टर उपलब्ध आहेत किंवा नाही हे समजत नाही. यासाठी येथे नोंद वही ठेवली जावी व कोणीतरी एका कर्मचाऱ्याने तरी याठिकाणी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उपलब्ध रहावे, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते संतोष धरेकर यांनी केली.
अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची प्रयत्न असफल
या संदर्भात सदर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. सतत प्रयत्न करूनही या हॉस्पिटलमधील कोणाचाही संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमका प्रकार काय आहे? याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून मिळाले नाही.









