रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा
बेळगाव : अतिवाड क्रॉस ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. दोन किलोमीटर रस्त्यावर ख•s पडल्याने ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. संबंधितांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने धक्के खातच ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू झाले नसल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अतिवाड क्रॉसपासून गावापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांची कसरत सुरू आहे. परिवहन मंडळाची बसदेखील याच ख•dयातून मार्ग काढते. शिवाय दैनंदिन कामगार, नोकरदार आणि शाळकरी मुलांना या रस्त्यातूनच ये-जा करावी लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा शेती असल्याने शेतकऱ्यांची देखील ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा होत असल्याने शेतीतील मालाची ने-आण करणे देखील कठीण होऊ लागले आहे.
काम तातडीने मार्गी लावा
निवडणुकीदरम्यान रस्ता, पाणी, वीज, वाहतूक या मूलभूत गरजा पुरविण्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अतिवाडवासीयांना रस्त्यासाठी झगडावे लागत आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी लहानसहान अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लोकप्रतिनिधींनी तातडीने मार्गी लावावे, अशी मागणीही होऊ लागली आहे.
सीमाहद्दीवरील रस्त्याकडेही दुर्लक्ष
अतिवाड क्रॉस ते कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीपर्यंतच्या अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या वाहनधारकांना कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत. याबाबत कित्येक वेळा तक्रारी आणि निवेदने देऊनदेखील याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र हद्दीतील नागरिकांचे मतदान संबंधित लोकप्रतिनिधीला मिळत नसल्यामुळे सीमाहद्दीतील रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्नही स्थानिक नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.









