निपाणीत राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणामुळे अडचणी : पावसाच्या उघडीपीमुळे धुळीच्या त्रासात भर
वार्ताहर/निपाणी
गेल्या तीन वर्षांपासून पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणासह नूतनीकरण असे संयुक्त काम सुरू करण्यात आले आहे. कोट्यावधीचा निधी खर्ची घालून होणारे हे काम येणाऱ्या काळात विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. असे असले तरी हे काम सुरू असताना वाहतुकीला कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. पण तसा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. सेवा रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि त्यातच महामार्गाची वाहतूक सेवा रस्त्यावरून अशा परिस्थितीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. सेवारस्त्यावर पडलेले खड्डे, अनेक ठिकाणी विखुरलेली खडी त्यातच उडणारी धूळ वाहनधारकांसाठी कसरत ठरत आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग योजना विकास अंतर्गत पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि नूतनीकरण सध्या गतीने सुरू आहे. हे काम अजून किती दिवस चालणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काम संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. काहीवेळा गतीने तर काहीवेळा संथगतीने हे काम सुरू आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून हे काम महत्त्वपूर्ण मानले जात आहे पण सद्यस्थितीला संबंधित कंत्राटदाराचे होणारे दुर्लक्ष हे अपघाता’ची संख्या वाढवण्याला कारण ठरत आहे. पाऊस सुरू असताना पावसामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सेवा रस्त्यांची अक्षरश: वाताहत झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर खडी विखुरली गेली असून ते वाहनांवरील ताबा सुटण्याला कारण ठरत आहे. काम सुरू असलेल्या महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याला वळवली जात आहे. यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक वाढत आहे.
सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवण्याचे नियोजन करत असताना सेवा रस्त्याची मलमपट्टी महत्त्वाची आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवणे देखील महत्त्वाचे आहे पण तसा प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे या महामार्गावरून आणि सेवा रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी अंधार असल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच ठिकठिकाणी मोठमोठे गतिरोधक निर्माण केले गेल्याने अनेकवेळा गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे. वाहनधारकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होताना दिसत आहेत. पाऊस कमी होताच धुळीचे लोळ उठताना अपघाताला नवे कारण निर्माण होऊ लागले आहे. काहीवेळा धूळ कमी करण्यासाठी पाणी मारण्याचा प्रयत्न केला जात असला तरी तो प्रयत्न मात्र अल्पकाळासाठी उपयोगी ठरत आहे.
वाहन तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट
महामार्गाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवली जात आहे. यामुळे सेवा रस्त्यावर गर्दी वाढताना दिसते. वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहनांची तपासणी करताना वेगवेगळी कारणे पुढे करत आर्थिक लूट केली जात आहे. वाहनधारकांना तपासणी करताना आवश्यक सूचना देणे गरजेचे आहे. पण तशा सूचना न देता फक्त दंडात्मक कारवाई करून काही पोलीस अधिकारी व कर्मचारी आपला खिसा गरम करू लागले आहेत. यामुळे वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून महामार्ग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी करावी, पण त्यासाठी योग्य जागा निवडावी व सुरक्षेचा विचार देखील प्राथमिकतेने करावा. फक्त आर्थिक लूट करण्यासाठी नव्हे तर वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी वाहनांची तपासणी केली जावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
महामार्गावरील रोजगारावर बेरोजगाराची छटा
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण आणि नूतनीकरणाचे काम हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. येणाऱ्या दोन वर्षात हे काम पूर्णत्वाला येईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. पण राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारावर मात्र संकटाचे छत्र निर्माण झाले आहे. महामार्गाची वाहतूक थेट असल्याने महामार्गालगत असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. अनेकांनी हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केली आहे. पण ही गुंतवणूक आता कर्जाचे ओझे बनण्याची चिंता हॉटेलचालकांना आहे. हाकेच्या अंतरावर पेट्रोलपंप निर्माण केलेत.









