नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहर हे एकेकाळी स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरलेले होते. मात्र, आज या शहरातील रस्ते आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर आणि भ्रष्ट अधिकारी-ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेवर गंभीर टीका केली. साळगावकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर परिस्थिती सुधारली नाही तर नागरिकांच्या सहकार्याने पुन्हा आंदोलन उभारले जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. सावंतवाडीतील प्रमुख रस्त्यांची स्थिती अतिशय खराब आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली, परंतु त्याचा परिणाम फक्त काही काळच टिकला. नागरिक, रिक्षाचालक, वाहनचालक या सर्वांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरीही, संबंधित विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.माजी नगराध्यक्ष साळगावकर यानी म्हटले आहे की, “रस्त्यांची अवस्था ही प्रशासनाच्या काळजीच्या अभावामुळेच अशी झाली आहे. रस्त्यांच्या देखभालीसाठी लागणारा निधी मंजूर होऊनही, त्याचा योग्य वापर झालेला नाही. ठेकेदारांच्या नफेखोरीच्या धोरणामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम फक्त कागदावरच उरले आहे. या सर्वामध्ये नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.शहरातील स्वच्छता व्यवस्थेचीही खूपच बिकट स्थिती आहे. पूर्वी दररोज सकाळी घंटागाड्या दारोदारी जाऊन कचरा गोळा करत असत. पण आता या गाड्या दुपारी ११-१२ वाजल्याशिवाय शहरात फिरतच नाहीत. सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला हा कचरा बाहेर ठेवण्यासाठी वेळ मिळत नाही, परिणामी शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतो. कचरा व्यवस्थापनावर करोडो रुपये खर्च करूनही, स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना समाधानकारक सेवा मिळत नाही.साळगावकर यांनी शहरातील कुत्र्यांच्या झुंडींचीही समस्या मांडली. शहरात ठिकठिकाणी मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटनाही वाढल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.माजी नगराध्यक्षांनी याबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली. त्यांनी सांगितले की, मुख्याधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रशासकीय बैठका घेऊन जुने मुद्दे आणि फाईल्स तपासून व्यवस्था कशी सुधारता येईल यावर काम करणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकली आहे.साळगावकर यांचे म्हणणे आहे की, “शहरात स्वच्छता व्यवस्थेवर खर्च केलेले करोडो रुपये कुठे गेले, याचा तपास होणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी नवीन योजना आणल्या जातात, पण प्रत्यक्षात त्यांचा काहीच फायदा होत नाही. ठेकेदार आणि अधिकारी एकत्र येऊन पैशांची उधळपट्टी करतात, आणि सामान्य नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. सावंतवाडीतील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाइट बंद पडलेले आहेत. रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार असतो, ज्यामुळे नागरिकांना रात्री सुरक्षितपणे फिरता येत नाही. याशिवाय, शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्थितीही अत्यंत खराब आहे. या शौचालयांचे व्यवस्थापन नीट होत नसल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.साळगावकर यांनी असेही सांगितले की, “शहराच्या व्यवस्थेतून कसे बदल घडवायचे हे प्रशासनाने जुने ताळेबंद तपासून समजून घ्यावे. मागील काळात अशा समस्यांना कधी सामोरे जावे लागले नव्हते, मग आता का?”शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाइट्स, आणि कुत्र्यांचा बंदोबस्त या सगळ्याच मुद्द्यांवर नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साळगावकरांनी केला आहे. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरच योग्य उपाययोजना न केल्यास, पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच येईल.