सर्जापूर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज बुलंद
कुडाळ: निसर्गाच्या कुशीत वसलेला, ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेला जावळी तालुका आज प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त आहे. शेतकरी, कष्टकरी आणि श्रमिक वर्गाने भरलेल्या या तालुक्यातील सर्जापूर गावातील शेतकरी आज थेट तहसील प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर गावातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिली. मात्र, अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी, आज शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे, परंतु पाणंद रस्ता बंद असल्याने १० ते १५ एकरवरील पीक शेतातून बाहेर काढणे अशक्य झाले आहे. शेतकरी वर्ग केवळ हातावर हात धरून आपले परिश्रम वाया जाताना पाहत आहे.
विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद रस्त्यांबाबत जारी केलेला शासन निर्णय (GR) हा स्पष्टपणे अंमलात आणण्याचे आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिलेले असतानाही, जावळी तालुक्याच्या महसूल अधिकाऱ्यांनी या GR ला केराची टोपली दाखवली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “एकेकाळी ‘शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही’ हा शिवमंत्र घेऊन काम करणारे अधिकारी आता गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित करून केवळ कागदोपत्री कामकाज करणाऱ्या तहसील प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.”
शेतकऱ्यांनी याप्रकरणी उच्चाधिकार्यांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, तहसील प्रशासनाने तातडीने पाणंद रस्ता खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सर्जापूरसह जावळी तालुक्यातील इतर अनेक भागांतही पाणंद रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या कायम आहे. प्रशासनाने याकडे गंभीरतेने पाहून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
“शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार करणारे अधिकारी आता कुठे हरवले?” शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रशासनाने जागं होणं आवश्यक आहे, नाहीतर ‘निष्क्रिय अधिकारी जावळीच्या माथी’ ही हाक आणखी बुलंद होईल. या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे








