ऐतवडे बुद्रुक :
वाळवा तालुक्याच्या पश्चिम टोकावरील ऐतवडे बुद्रुक व परिसरातील ढगेवाडी, कार्वे, शेखरवाडी, जक्राईवाडी ही गावे अनेक योजनापासून वंचित असणारी गावे. येथील ढगेवाडी ते ऐतवडे बुद्रुक रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. प्रवाशांना, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
ऐतवडे बुद्रुक ही शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी, कर्मभूमी असून या परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. ऐतवडे बुद्रुक येथे आठवडी बाजार, पोस्ट, ऑफिस, बँका, सोसायटी, दूध संस्था, शाळा, विद्यालय असल्यामुळे आसपासच्या गावातील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना नेहमी ये-जा करावे लागत आहे. परंतु येथील रस्ते खराब असल्यामुळे त्यांना नाहक त्रास होत आहे. याची प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
ऐतवडे बुद्रुक हनुमान मंदिर ते ढगेवाडी हनुमान मंदिर रस्ता अशी शासन दरबारी नोंद असून या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. आजपर्यंत त्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.
या रस्त्याच्या दुतर्फा ढगेवाडी तसेच ऐतवडे बुद्रुक ग्रामस्थांनी रस्त्यालगत आपल्या शेत जमिनीत घरे बांधली आहेत. या दरम्यान कुंभार समाजातील कुटुंबे राहत असल्यामुळे येथे त्यांचा पारंपारिक गौरी गणपती बनवण्याचा व्यवसाय असून प्रतिवर्षी तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील अनेक गणेशोत्सव मंडळ हे मूर्ती नेण्यासाठी येत असतात. सध्या तालुक्यासह जिल्ह्यात महाराष्ट्रात नवीन रस्त्यांचे जाळे विणण्याचा शासनाने उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिराळा-आष्टा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा संपूर्ण रस्ता उखडला असल्यामुळे प्रवाशांना, वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सध्या मान्सूनपूर्व पावसाळा व अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था दैयनीय झाली आहे. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे या चिखलातूनच प्रवाशांना मार्ग काढत जावा लागत आहे. ढगेवाडी फाटा ते ऐतवडे बुद्रुक हा पर्यायी मार्ग असतानासुद्धा या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. तरी संबंधित विभागाने या वंचित, दुर्लक्षित रस्त्याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.








