अनेक गावांमध्ये बसथांबेच नाहीत : झाडेझुडुपे वाढलेली : स्वच्छतेचा अभाव; दुर्गंधीचे साम्राज्य : बसथांब्याअभावी प्रवाशांना पावसात थांबण्याची वेळ

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
ग्रामीण भागातील अनेक गावांमधील बसथांब्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. बहुतांशी गावांच्या रस्त्याच्या बाजूला बसथांबेच नाहीत आणि ज्या ठिकाणी बसथांबे आहेत. त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे सध्यातरी प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना पावसात भिजतच थांबावे लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष कधी जाणार, असा सवाल नागरिक व प्रवासी वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. लाखो रुपयांचा निधीही खर्च केला जातो. मग प्रत्येक गावच्या रस्त्याच्या बाजूला किंवा काही मुख्य ठिकाणी बसथांबे असायला हवेत. याचे भान कोणालाच का बरे राहत नाही?
बसथांबे नसल्यामुळे व असलेले बसथांबे मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना ऊन पावसातच थांबावे लागत असल्याचे चित्र बऱयाच ठिकाणी दिसून येत आहे. रस्ते, पाणी व इतर योजना याकडे सर्वांचे लक्ष असते. याकरिता ग्रा. पं. सदस्य निधी मंजूर करून घेण्यासाठी जिवाचे रान करतात. मात्र बसथांब्यांचा हा प्रश्न बहुतेक जणांच्या लक्षातच येत नाही.
तालुक्याच्या बहुतांशी भागातील बसथांबे ओसाड पडलेले आहेत. तर काही ठिकाणी बसथांबाच नाही. यामुळे प्रवाशांना एखाद्या दुकानाचा, घराचा, अथवा झाडसावलीचा आधार घ्यावा लागत आहे. बऱयाच ठिकाणचे बसथांबे मद्यपिंचा अड्डा बनत आहे. रात्रीच्या वेळी या बसथांब्यांमध्ये बसून दारू पिण्याचे प्रकार घडतात. दारू पिऊन बाटल्याही बसथांब्यावरच टाकून दिल्या जातात. बसथांब्यांमध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी बसथांब्यांमध्ये विद्युत रोषणाई करणे आवश्यक आहे.
आपल्या गावातील नागरिकांना बसथांबा नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. हे लक्षात घेऊन ग्रा. पं. च्यावतीने बसथांबे उभारण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, ग्रा. पं. सदस्यांकडून याकडे दुर्लक्ष झाले असल्याने प्रवाशांना मात्र, ऊन-पावसातच थांबावे लागत आहे. काही गावांतील प्रवाशांना थांबावे कोठे, असा प्रश्नही उभा राहिला आहे.
टिपू सुलताननगर, हुंचेनहट्टी क्रॉस याठिकाणी बसथांबा आहे. मात्र, या बसथांब्यामध्ये केरकचरा टाकण्यात आला असून त्याच्या आजुबाजूला झाडे-झुडुपे वाढलेली आहेत. या बसथांब्याच्या बाजूलाच डिव्हाईन मर्सी स्कूल, जैन कॉलेज आहे. बसथांबा व्यवस्थित परंतू झाडाझुडुपांनी वेढला असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूलाच थांबावे लागत आहे. यामुळे पालकवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बहाद्दरवाडी क्रॉस, नावगे क्रॉस, पोलीस क्वॉर्टर्स, मच्छे, कावळेवाडी, बेळगुंदी, इनाम बडस, बाकनूर क्रॉस आदी ठिकाणी बसथांबेच नाहीत. मग इथल्या प्रवाशांनी थांबायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांच्या खाली थांबले तरीही सध्या पावसाळा असल्याने भिजावे लागत आहे, अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे.
बसथांबे नसल्याची माहिती देणे आवश्यक
ग्राम पंचायत सदस्यांनी ज्या ठिकाणी बसथांबे नाहीत त्याबद्दल आपापल्या ग्राम पंचायतीला कळविण्याची गरज आहे. त्यानंतर ग्रा. पं. च्यावतीने अमुक याठिकाणी बसथांबा पाहिजे. यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करून बसथांबे बांधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
बेळगुंदीत बसथांबाच नाही

बेळगुंदी गावात बसथांबा नसल्यामुळे प्रवाशांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. गावच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या पिंपळकट्टय़ाचा आधार घ्यावा लागत आहे. काही जण मंदिरात बसतात. सुमारे 7 हजारहून अधिक गावची लोकसंख्या आहे. मात्र बसथांबा नाही. बेळगुंदी हे या भागासाठी केंद्रबिंदू आहे. यामुळे अनेकांची ये-जा बेळगुंदीला असते. तसेच या भागात अनियमित व अपुऱया बसफेऱयांची समस्याही कायम आहेच.
– देवाप्पा शिंदे, बेळगुंदी
मच्छे गावातही बसथांब्याचा अभाव

बेळगाव-पणजी या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या मच्छे गावात एकही बसथांबा नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. मच्छे गावचा विस्तार झपाटय़ाने झाला आहे. औद्योगिक वसाहत, शाळा, कॉलेज, विविध कार्यालये यामुळे मच्छेजवळ नेहमीच प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. मात्र, याचठिकाणी बसथांबा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाघवडे व इतर गावातील विद्यार्थ्यांनाही याठिकाणी पावसातच भिजत थांबावे लागत आहे.
– मारुती आंबोळकर, वाघवडे
बहाद्दरवाडी क्रॉस-प्रवाशांना झाडाचा आधार

बहाद्दरवाडी क्रॉस येथे बसथांबा नाही. यामुळे प्रवाशांना एका झाडाखाली थांबावे लागत आहे. याठिकाणी बहाद्दरवाडी, किणये, कर्ले, जानेवाडी आदी भागातील प्रवासी थांबतात. मात्र, बसथांबा नाही. हा क्रॉस या भागात महत्त्वाचा आहे. बसथांबा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. किणये ग्रा. पं. ने याची दखल घेऊन याठिकाणी बसथांबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
-निलेश चौगुले, शिवनगर, बहाद्दरवाडी









