फोंडा : वादविवाद, प्रचंड गदारोळ व पोलीस बंदोबस्ताशिवाय हल्ली ग्रामसभा क्वचितच होताना दिसतात. त्यात एखाद्या पंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीत झाल्याचे अपवादही कमीच आढळतात. पण फोंडा तालुक्यात अशाही काही पंचायती आहेत, जेथे ग्रामसभेला एकूण पंचसदस्यांच्या संख्येएवढेही लोक उपस्थित नसतात. वाडी-तळावली पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत अवघे सहा ते सात ग्रामस्थ उपस्थित होते. ज्यामुळे काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. मागील एक दोन ग्रामसभाही अशाच खाली खर्च्यांसमोरच घेण्याची नामुष्की पंचायत मंडळावर ओढवली.
वाडी-तळावली ग्रामपंचायत ही ‘क’ गटात म्हणजे गरीब पंचायतींमध्ये येते. सहा महिन्यांपूर्वी प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात आलेला मोबाईल टॉवरचा मुद्दा तेवढा ग्रामसभेत गाजला होता. त्यानंतर मागील एक दोन ग्रामसभांना सरपंच व उपसरपंच धऊन सात पंचसदस्य व तेवढेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या अत्यल्प उपस्थितीमुळे विकासकामाचे मुद्दे व पंचायतीसंबंधी काही धोरणात्मक निर्णय घेणे अवघड होत आहे. सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या ग्रामसभेत भाडेकऊ ठेवणाऱ्या घरमालकांकडून एका महिन्याचे भाडे पंचायतीने करस्वऊपात वसूल करावे हा महत्त्वाचा विषय होता. मात्र लोकांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही. रामनाथ नाईक या ग्रामस्थाने महालक्ष्मीनगर प्रभाग 7 मध्ये उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर व उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यासंबंधी लेखी प्रश्न दिले होते. त्यावरही चर्चा होऊ शकली नाही. जेमतेम तासभरात ही सभा आटोपती घ्यावी लागली.
समित्या निवडतानाही पंचायतीची नामुष्की
ग्रामस्थांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे सरकारच्या विविध समित्या निवडायच्या कशा हा प्रश्न पंचायतीसमोर कायम उपस्थित हेत असतो. प्रत्येक पंचायतीने ग्रामविकास समिती, कचरा व्यवस्थापन समिती, दक्षता समिती, जैवविविधता समिती अशा साधारण अठरा ते वीस समित्या निवडण्याची सक्ती आहे. मात्र वाडी तळावली पंचायतीच्या ग्रामसभेला मोजकेच लोक उपस्थित राहत असल्याने त्याच त्याच लोकांना आलटून पालटून विविध समित्यांवर घालण्याशिवाय पर्याय उरत नाही. विकासकामे व महसूलवाढीसंबंधी काही महत्त्वाचे निर्णयही गणपूर्ती अभावी प्रलंबित ठेवावे लागत आहेत.









