मुंबई :
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गर्व्हनरपदी पूनम गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या डायरेक्टर जनरल असणाऱ्या पूनम गुप्ता यांची डेप्युटी गर्व्हनर म्हणून नियुक्ती केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये डेप्युटी गर्व्हनरपदावरुन एम. डी. पात्रा पायउतार झाले होते. त्यांच्या जागी आता पूनम गुप्ता या पदभार सांभाळणार आहेत. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची द्विमासिक बैठक 7 एप्रिल रोजी होणार असून त्यापूर्वी डेप्युटी गर्व्हनरची निवड करण्यात आली आहे. पूनम गुप्ता या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या असून 16 व्या वित्त आयोग परिषदेच्या सल्लागार म्हणूनही काम पाहतात. 2021 मध्ये त्यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च आपल्या कार्याला प्रारंभ केला होता. या शिवाय आंतरराष्ट्रीय नाणे निधी तसेच जागतिक बँक या ठिकाणीही त्या दोन दशकांहून अधिक कालावधी वरिष्ठ पदावर काम करत होते. मेरीलॅन्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये मास्टर्स पदवी आणि पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिकमधून त्यांनी अर्थशास्त्र विषयात मास्टर्स पदवी प्राप्त केली आहे.









