व्यापलेल्या भागात बांधकाम : भारताची नजर असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाखमधील पँगॉन्ग लेकवर चीनच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. चीन लडाखमधील महत्वाच्या पँगॉन्ग लेकवर पुन्हा एक नवा पूल बांधत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच काही नवीन सॅटेलाईट फोटोंमधून हा प्रकार समोर आला आहे. या पुलाच्या माध्यमातून चीन पुन्हा एकदा एलएसीवर आपले वर्चस्व वाढण्याची योजना आखत आहे. यातून चिनी सैन्याला या प्रदेशात आपले सैन्य लवकर हलवण्यास मदत होणार आहे. याआधीही चीनने पँगॉन्ग लेकवर पूल बांधला आहे. लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावाजवळ दुसरा पूल बांधण्याच्या चीनच्या हालचालीवर केंद्र सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. चीन व्यापलेल्या भागात पूल बांधत असून तो बेकायदेशीर आहे. आम्ही ड्रगनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ पूर्व लडाखमधील अनेक तणावाच्या ठिकाणी भारत आणि चिनी सैन्यादरम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पूल बांधला जात आहे. या नवीन बांधणीबाबत भारतीय संरक्षण आस्थापनेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा टिप्पणी आलेली नाही. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी मतप्रदर्शन करताना चीनच्या हालचालींवर नजर असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. एलएसीबाबत आमच्यात वारंवार चर्चा होत असते. चिनी परराष्ट्रमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भारताच्या अपेक्षाही त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या असून संवादातून तोडगा काढण्यावर भारताचा भर असल्याचे बागची यांनी सांगितले.
नव्या पुलावरून लष्करी वाहने जाऊ शकतील
चीन बांधत असलेल्या नव्या पुलावरून लष्करी वाहनेही जाऊ शकतील. त्याचबरोबर नवीन पूल पूर्णपणे जुन्या पुलाला लागून आहे. यापूर्वी बांधण्यात आलेला पूल सेवा सेतू म्हणून वापरला जात आहे. चीनकडून दोन्ही बाजूंनी पुलाचे बांधकाम सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून त्याचे अंतर 20 किमी पेक्षा जास्त आहे.
एप्रिलमध्ये पहिल्या पूलाचे काम पूर्ण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने एप्रिलमध्ये पहिल्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. या पुलाच्या बांधकामाची माहिती जानेवारी महिन्यात समोर आली होती. या पुलावरून हलकी वाहने व शस्त्रसामग्रीचा पुरवठा होत आहे. भविष्यात पँगॉन्ग सरोवरावरून भारतासोबत वाद निर्माण झाल्यास त्याला सामरिक किनार मिळावी यासाठी चीन याची बांधणी करत आहे. 1958 पासून चीनच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात हा पूल बांधण्यात आला आहे. त्यासाठी आधीपासून तयार केलेली रचना वापरली जात आहे. 1958 पासून चीनने या जमिनीवर कब्जा केला आहे. पँगॉन्ग सरोवर लडाख आणि तिबेटच्या मधोमध असल्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला आहे. भारताने येथे चीनवर बाजी मारली आहे. पँगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील उंच भागांवर भारताने पकड कायम ठेवली आहे.









