दुसऱया दिवशीही ईडीची कारवाई ः भ्रष्टाचारी साम्राज्याचा पर्दाफाश
नवी दिल्ली, रांची / वृत्तसंस्था
झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल आणि तिच्या निकटवर्तीयांवर अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई दुसऱया दिवशीही सुरूच आहे. कारवाईदरम्यान सुमारे 150 कोटींची मालमत्ता उघड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ईडीचे अधिकारी शनिवारी सकाळी पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या मालमत्तेच्या तपासासाठी पहाटे रांची येथील पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. यासोबतच देशातील 11 ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. पूजा सिंघलचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
पूजा सिंघल यांच्याशी संबंधित 25 हून अधिक ठिकाणी छाप्यांद्वारे कारवाई सुरू आहे. तब्बल दोन दिवस चाललेल्या या कारवाईत सिंघल यांच्या सीए सुमन सिंह यांच्या हनुमाननगरातील घरातून 19.31 कोटींची रोकड सापडली आहे. ईडीच्या पथकाने पूजाचे मुझफ्फरपूर येथील सासरे कामेश्वर झा, त्यांचा भाऊ, आई-वडील आणि दिल्लीत राहणारे सहकारी यांच्या घरावरही छापे टाकले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई
ईडीच्या पथकाने कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरिदाबाद येथेही छापे टाकले. रात्री उशिरा पथकाने सर्व कागदपत्रे सोबत नेली. जेई रामविनोद सिन्हा यांना ईडीने खुंटी येथील मनरेगा घोटाळय़ात अटक केली होती. त्याच्याकडून 4.25 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. खाण सचिव पूजा सिंघल यांच्यावर ईडीने शुक्रवारी केलेली कारवाई अचानक नव्हती. त्याची पार्श्वभूमी आधीच तयार होती. केंद्र सरकारने राज्यातील कलंकित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांची यादी राजभवनाकडून मागवली होती. अशा अधिकाऱयांची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले. सुमारे महिनाभरापूर्वी राज्य सरकारने चार अधिकाऱयांची नावे राजभवनाला पाठवली होती. या यादीमध्ये पूजा सिंघल यांचे नाव अग्रस्थानी होते.
लवकरच आणखी अनेक अधिकाऱयांवर ईडीची कारवाई होण्याची शक्मयता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये सीएमओचा एक अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱया बांधकामाशी संबंधित अनेक विभागांचे प्रमुखपद भूषवलेल्या अधिकाऱयाचा समावेश आहे. याशिवाय अन्य प्रभावशाली आणि प्रचंड माया गोळा केलेल्या व्यक्तींवरही ईडीकडून कारवाई होण्याची शक्मयता आहे.









