मराठा युवक संघातर्फे हृद्य सत्कार : मिरवणूक
बेळगाव : दक्षिण आफ्रीका पोर्ट एलिझाबेथ येथे राष्ट्रकुल ज्युडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बेळगावच्या होसूरची कन्या पूजा प्रकाश शहापूरकर हिने 57 किलो वजनी गटात दक्षिण आफ्रीकेच्या प्रेसीयसचा वझारी व ईफोनमध्ये 20-0 अशा गुणफरकाने पराभव करून जेतेपद पटकावित भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याबद्दल होसूर येथील नागरिकांनी तिचा सत्कार करून तिची मिरवणूक काढत स्वागत केले. एलिझाबेथ येथे राष्ट्रकुल ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताच्या ज्युडो संघाने भाग घेतला होता. त्यामध्ये कर्नाटक बेळगाव होसूर येथील कन्या पूजा प्रकाश शहापूरकर हिने 57 किलो वजनी गटात उपांत्यफेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रीका एलिझाबेथच्या ज्युडोपटू एनएसतीथीया अलेक्सझांडर हिचा 22-6 पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत बलाढ्या दक्षिण आफ्रीकेच्या बीओटी प्रेसीयस हिच्याबरोबर पूजाची कडवी लढत होती. पण तिने जिद्दीने अंतिम सामन्यात प्रारंभ वझारीमध्ये वर्चस्व मिळवत ईफोनवर गुण मिळवून 20-0 अशी आघाडी मिळविली. त्यानंतर प्रेसीयसने लढतीत बरोबरी करण्यासाठी प्रयत्न केला. पण पूजाने तिच्या प्रयत्नाला थोपवून सुवर्णपदक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते पूजा शहापूरकर हिला सुवर्णपदक, प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.
ज्युडोमध्ये बेळगावचे नाव उज्ज्वल करणारी पूजा ही दुसरी कन्या आहे. यापूर्वी तुरमुरीच्या मलप्रभा जाधव हिने ज्युडोमध्ये भारताला पदक मिळवून दिले होते. या यशानंतर तिचे विमानाने बेळगावला आगमन झाले. तिच्या यशानंतर होसूर येथील नागरिकांनी विमानतळावर जाऊन पूजाचे अभिनंदन करून स्वागत केले. त्यानंतर होसूर पिंपळकट्टा येथून तिची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. भारताला मिळवून दिलेल्या पदकामुळे परिसरातील नागरिकांनी तिचा खास गौरव केला. मराठा मंगल कार्यालय येथे होसूर बसवाण्ण गल्ली येथील पंचमंडळी व ज्येष्ठ नागरिकांनी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्या ठिकाणी कार्यालयाचे अध्यक्ष शिवाजी सैनुचे, भरतअण्णा पाटील, जयंत जाधव, कार्यालयाचे संचालक भाऊराव सैनुचे, रवी भोसले, मारूती डोळेकर, कल्लाप्पा शहापूरकर, आनंद जाधव, मारूती हलगेकर, अशोक भातकांडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजाला शाल, श्रीफळ व भेटवस्तु देऊन तिचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी बसवाण्ण गल्लीतील नागरिक, महालक्ष्मी महिला मंडळचे कार्यकर्ते, सुरभी फंड, मराठा युवक मंडळ व इतर नागरिकांच्या हस्तेही तिचा गौरव करण्यात आला. पूजा ही सीआयएसएस येथे रूजू असून तिला भारतीय ज्युडो प्रशिक्षीका अनिता दलाल, कर्नाटकाचे प्रशिक्षक जितेंद्र सिंग, त्रिवेणी सिंग, रोहिणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









