दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊ शकलेली नाही. न्यायाधीश सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने ही सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत टाळली आहे. तत्पूर्वी दिल्लीच्या पतियाळा हाउस न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी तिला दिलासा देण्यास नकार दिला होता. यानंतर पूजा यांनी 8 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
2023 च्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी राहिलेल्या पूजा विरोधात युपीएएसीने निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वेळा नागरी सेवा परीक्षा दिल्याप्रकरणी एफआयआर नेंदविला होता. पूजा खेडकर या जून 2024 पासून प्रशिक्षण घेत होत्या. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी युपीएससी सीएसई-2022 परीक्षेत स्वत:शी निगडित खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. युपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा दोषी आढळून आल्या. यानंतर 31 जुलै रोजी पूजा यांची निवड रद्द करण्यात आली. तसेच भविष्यात युपीएससीची कुठलीही परीक्षा त्यांना देता येणार नाही.