वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंगने बेन स्टोक्सच्या सामना जिंकण्याच्या क्षमतेची तुलना महेंद्रसिंह धोनीच्या मैदानावरील कामगिरीशी केली आहे. जसा दिग्गज भारतीय खेळाडू धोनी होता तसाच इंग्लंडचा कर्णधार दबावाच्या परिस्थितीत खेळण्याच्या बाबतीत त्याच्या समकालीन खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे असे मत पाँटिंगने व्यक्त केले आहे.
अॅशेस मालिकेतील लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत 214 चेंडूंत 155 धावा करत स्टोक्सने जवळजवळ एकहाती इंग्लंडला मालिकेत बरोबरी साधून देण्याच्या जवळ पोहोचविले होते. त्याने ऑस्ट्रेलियाला दणका देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 च्या अॅशेसमध्ये त्याने नाबाद 135 धावांची खेळी करून यजमानांना लीड्सवर एक गडी राखून उल्लेखनीय विजय मिळवून दिला होता.
मला वाटते की, कोणताही आंतरराष्ट्रीय खेळाडू जेव्हा खेळण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याच्यावर दबाव असतोच. परंतु बेन मधल्या फळीमध्ये किंवा नंतरच्या क्रमवारीत ज्या प्रकारे फलंदाजी करतो ते पाहता कदाचित इतरांपेक्षा त्याला जास्त सामना जिंकण्याच्या संधी सापडतात, असे पाँटिंगने म्हटले आहे.
याबाबतीत पहिल्यांदा मनात धोनी येईल, ज्याने अनेक टी-20 सामन्यांच्या शेवटपर्यंत टिकून राहून सामने संपविले. तर बेन कसोटी सामन्यांच्या शेवटपर्यंत टिकून राहून तशी कामगिरी करत आहे. खेळाच्या इतिहासात अशा प्रकारची भूमिका बजावून सामना जिंकून देणारे आणि तेही विशेषत: कर्णधारपदाची जबाबदारी पेलताना, फारसे खेळाडू सापडणार नाही, असे पाँटिंगने म्हटले आहे. लॉर्ड्सवरील शेवटच्या दिवशीचा रोमांचक खेळ पाहताना आपल्या मनात हेडिंग्ले येथे स्टोक्सने यापूर्वी केलेली सामना जिंकून देणारी खेळी होती, असेही त्याने यावेळी सांगितले.









