वन्यप्रेमींतून नाराजी : पाणी साठले नसल्याने समस्या गंभीर : शासनाने लक्ष देण्याची मागणी : धरणातील पाणीपातळीही झाली कमी
बेळगाव : वन्यजीवांची शिकार करणे किंवा त्यांना मारणे असे प्रकार वारंवार घडतात. विशेष करून त्यांच्या रक्षणासाठी अनेक संघटना आवाज उठवितात. मात्र हा आवाज उन्हाळ्यात गायब होतो. वन्यजीवांसाठी काही ठिकाणी खोदाई करण्यात आलेले तलाव आता कोरडे पडले आहेत. त्यामुळे त्यांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणी नसल्याने आता समस्या निर्माण होत असून याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. तालुका पंचायत, ग्राम पंचायतच्या माध्यमातून त्यांना जीवदान देण्यासाठी होनगा येथे तलावाची खोदाई करण्यात आली होती. वनविभाग व ग्राम पंचायतीने उद्योग खात्री योजनेचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता. उद्योग खात्री योजनेतून तलावाची निर्मिती केली. मात्र पाऊस नसल्याने ते तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी होनगा परिसरात असलेल्या वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगण्यात येत आहे.
तलावात पाणी साठवणूकसाठी पुढाकार घेण्याची गरज
उद्योग खात्रीतून वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या काकती-होनगा येथे तलाव बांधण्यात आले आहे. यासाठी वनविभाग, तालुका पंचायत तसेच ग्राम पंचायतीनेही पुढाकार घेतला. काकती येथे असणाऱ्या अरण्य परिसरात प्राण्यांसाठी कोणतेच धरण अथवा पाण्याचे स्तोत्र नव्हते. त्यामुळे काही प्राणीही दगावल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र या ठिकाणी सरकारकडून निधी मागितला तर बराच उशीर लागणार आणि पुन्हा पाण्यामुळे प्राण्यांचे हाल होणार, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. याचा विचार करून उद्योग खात्री योजनेतून खोदाई करून तलावाची निर्मिती करण्यात आली. पाणी बचावसाठी आता वनखाते व तालुका पंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाऊस नसल्याने मोठी समस्या
या तलावासाठी दररोज 400 कामगारांना या ठिकाणी काम देण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून या तलावामध्ये पाणीही साचून होते. या परिसरातील प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या तलावाचा फायदा वन्यजीवांना होत होता. बेळगाव तालुक्मयात प्राण्यांसाठी तलाव बांधण्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने इतरत्रही अशी कामे करण्यात आली. मात्र आता पाऊस नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे.
संपूर्ण धरण कोरडे पडल्याने चिंता
काकती येथील अरण्य शेकडो एकरमध्ये पसरले आहे. या ठिकाणी प्राणी, पक्षी तसेच इतर जातीचे प्राणी आहेत. मात्र पाणी नसल्याने काही प्राणी मानवी वस्तीत घुसत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या तलावाला उद्योग खात्रीची जोड देण्यात आली अन् तलाव बांधून पूर्ण झाले. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. संपूर्ण धरण कोरडे पडल्याने अधिकारीही चिंता व्यक्त करू लागले आहेत.









